पुनश्‍च हनिमून नाटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुनश्‍च हनिमून नाटक
पुनश्‍च हनिमून नाटक

पुनश्‍च हनिमून नाटक

sakal_logo
By

नवे नाटक
पुनःश्‍च हनिमून
---
- महेश बर्दापूरकर

धडपड संसार रुळावर आणण्याची...
पती-पत्नीमधील नातेसंबंध, नव्याची नवलाई संपल्यानंतर रोजच्या प्रश्‍नांना सामोरे जाताना होणारी ओढाताण, आपापलं करिअर आणि त्यात जोडीदाराचा ‘अयथळा’ असा खडखडाट सुरू राहतो. नात्यांमध्ये संगणकाप्रमाणं ‘एफ ५’चं बटण दाबून संसार रिफ्रेश करण्याची सोय नसली, तरी तो प्रयत्न नक्कीच करता येऊ शकतो. ‘पुनःश्‍च हनिमून’ या संदेश कुलकर्णी लिखित व दिग्दर्शित, अमित फाळके निर्मित नाटकातील जोडपं असा प्रयत्न करतंही, पण भूतकाळाचं ओझं इतकं जड असतं, की ते उतरवून नव्यानं सुरवात करणं सहज शक्य नसल्याचं त्यांच्या लक्षात येतं. आजच्या तरुण जोडप्यांसमोरील आव्हानांवरील उत्तरं शोधू पाहणारी कथा, नेटकं लेखन आणि दिग्दर्शन, कलाकारांना देखणा अभिनय, नेपथ्य आणि संगीत या जमेच्या बाजू असल्यानं हे नाटक अविस्मरणीय अनुभव देतं.
सुहास देशपांडे (संदेश कुलकर्णी) हा मनस्वी लेखक. त्याच्या पहिल्याच पुस्तकाला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे, मात्र दुसरं पुस्तक लिहिण्याचं त्याला खूप प्रयत्न करूनही जमत नाही. त्याची पत्नी सुकन्या (अमृता सुभाष) टीव्ही ॲंकर आहे व त्यांच्या लग्नाला आठ वर्षं झाली असून, दोघांत छोट्या-छोट्या गोष्टींवरून खटके उडत आहेत. संसार पुन्हा रुळावर आणण्यासाठी, सुहासला लेखनाची प्रेरणा मिळण्यासाठी सुकन्या पहिला हनिमून झाला त्या माथेरानमधील हॉटेलमधील त्यात रूममध्ये जाऊन पुन्हा एकदा हनिमून करण्याचा घाट घालते. तिथं पोचताच सुहासच्या तोंडी असलेलं, ‘सुकन्या, आपण रस्ता चुकलो आहोत,’ हे वाक्य दोघांच्या संसाराची स्थिती दर्शवतं. हॉटेलमधील रूम त्यांना त्यांच्या मुंबईतील घराप्रमाणेच भासू लागतं. सुहासनं चिडून तोडलेला बाथरूमचा दरवाजाही इथं तसाच आहे! दोघांनाही आपला भूतकाळ विसरून वर्तमानात जगणं अवघड झालंय, मुंबईच्या गर्दीत हरवून गेलेलं निवांत आयुष्य माथेरानमध्येही त्यांना पुन्हा गवसत नाहीये. या सर्वांचा दोष ते दोघंही एकमेकांवर टाकू पाहात आहेत. सुहासची आई त्यांच्या वडिलांना सोडून गेली होती आणि त्यामुळं त्याच्या वडिलांनी आत्महत्या केलेली असते. या प्रसंगाचा संदर्भ घेत सुकन्या सुहासला म्हणते, ‘‘तुझ्या वडिलांनी तुझ्या आईला कंटाळून आत्महत्या केली, तुही मला कंटाळून हळूहळू आत्महत्याच करतो आहेस.’’ सुहासनं त्याच्या आगामी कादंबरीतील प्रकरणाचं केलेलं वाचन आणि त्यात नायकानं आपल्या पत्नीचा खून करणं या गोष्टी येतात आणि या दोघांचे संबंध पुन्हा हनिमूनला आल्यावरही टोकाचे ताणले जातात...यातून हे जोडपं बाहेर येतं का, या दोघांच्या संसाराचं काय होतं याची उत्तरं नाटकाच्या शेवटी मिळतात.
नाटकाच्या कथेत कोणत्याही महानगरात राहणाऱ्या तरुण जोडप्यांना भेडसावणाऱ्या प्रश्‍नांना भीडण्याचा प्रयत्न लेखक-दिग्दर्शकानं केला आहे. दैनंदिन समस्यांचा सामना करताना जोडप्यांना अनेक मानसिक आंदोलनांना सामोरं जावं लागतं, त्याचा परिणाम त्यांच्या वैवाहिक जीवनावर होतो आणि ते पुन्हा रुळावर आणणं तितकं सोपं नसतं हे दाखवण्याचा प्रयत्न कथेत दिसतो. त्यासाठी लेखक आणि टीव्ही ॲंकर अशा जोडप्याची योजना करतो. लेखकाच्या क्रिएटिव्हीटी अपेक्षित अवकाश न मिळाल्यास त्याची वाढ खुंटते, तर पत्रकारितेसारख्या क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणीच्या खासगी आयुष्यात काहीच वेगळं घडत नसल्यास तिचीही कुचंबणा होते. याचा परिणाम थेट मानसिक स्थिती बिघडण्यावर होतो व याचं नेमकं चित्रण कथेत येतं. त्याच्या जोडीला काटे नसलेले घड्याळ आणि हॉटेलमधील बेडच्या पार्श्‍वभूमीवरील नेपथ्य या गोष्टी कथा अधिक टोकदारपणे पोचवतात.
संदेश कुलकर्णीनं लेखन व दिग्दर्शनाच्या जोडीला अभिनयाच्या आघाडीवरही छान कामगिरी केली आहे. पल्लेदार संवाद सहजपणे सादर करीत तो प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतो. मानसिक स्थितीमुळं बोलताना मध्येच अडकून पडण्याचा अभिनय त्यानं ताकदीनं पेलला आहे. अमृता सुभाषनं सुकन्याच्या भूमिकेत अनेक गहिरे रंग भरले आहेत. संसार पुन्हा रुळावर आणण्यासाठीची तिची धडपड, त्यासाठी पतीसाठी हवं ते करण्याची तयारी या गोष्टी तिनं छान साकारल्या आहेत. अमित फाळके आणि आशुतोष गायकवाड अनेक छोट्या-छोट्या भूमिकांत धमाल करतात.
एकंदरीतच, कोणत्याही महानगरातील जोडप्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचं प्रतिनिधित्व करणारं व उत्तर शोधू पाहणारं हे नाटक प्रत्येकानं अनुभवानं असंच.
-----
छायाचित्र ः ६७२६६
------

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r07101 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top