
''ढोलताशाचा समावेश क्रीडा स्पर्धांमध्ये करू''
पुणे, ता. २९ : ''''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पूर्वीपासूनच पारंपरिक खेळांना प्रोत्साहन देण्याचे धोरण आहे. मोठ्या क्रीडा स्पर्धांमध्ये ढोल ताशा वादनामुळे क्रीडाप्रेमींमध्ये उत्साह निर्माण होऊ शकतो. त्यामुळे खेलो इंडियासह इतर स्पर्धांमध्ये ढोल ताशा पथकांना वादनासाठी संधी दिली जाईल,'''' असे आश्वासन केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिले.
ठाकूर यांनी शनिवारी (ता. २८) ग्रामदैवत कसबा गणपती येथे दर्शन घेतले. यावेळी खासदार गिरीश बापट, भाजपचे संघटन सरचिटणीस राजेश पांडे, सरचिटणीस राजेश येनपुरे, माजी नगरसेविका गायत्री खडके, स्वरदा बापट आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात खासदार गिरीश बापट म्हणाले, पंजाबचा भांगडा, गुजरातचा गरबा तसे महाराष्ट्रात ढोलाताशा शिवाय कोणताही उत्सव साजरा होत नाही. पुण्यात सुमारे २०० ढोलताशाचे संघ असून, २५ हजार वादक आहेत. नाशिक, मुंबई, ठाणे यासह इतर शहरातही ढोल ताशा आवडीने वाजविला जातो. पण यास अजून राजमान्यता मिळालेली नसल्याने वादकांमध्ये खंत आहे. त्यामुळे ढोल ताशा खेळास खेळ म्हणून मान्यता द्यावी.
अनुराग ठाकूर यांनी यावेळी बापट यांची मागणी मान्य असेल तर ढोल वाजवून त्याचे स्वागत करा, असे आवाहन करताच ढोल ताशाची निनाद झाला. यावेळी ठाकूर यांनी ढोल ताशाला वादनासाठी मान्यता देण्यात येईल, असे सांगितले. या कार्यक्रमानंतर ठाकूर यांनी बुधवार पेठेतील गुलशे तालीम चौक येथे केंद्र सरकारच्या योजनेचे उद्घाटन केले.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22r07285 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..