
पुण्यात कोरोनाचा नवीन व्हेरियंट सात रुग्ण आढळले; सर्व जण गृहविलगीकरणात खडखडीत बरे
पुणे, ता. २८ : शहरात कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचे सात रुग्ण आढळले आहेत. जनुकीय क्रमनिर्धारणातून (जिनोम सिक्वेंसिंग) याचे निदान झाले असून हे सर्व रुग्ण आता पूर्णतः बरे झाले आहेत. मात्र, यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या समन्वयाचे जनुकीय क्रमनिर्धारण सुरू आहे. त्यातील नुकत्याच आलेल्या अहवालातून हा निष्कर्ष निघाला आहे.
कोरोनाच्या ‘बीए : ४’ उपप्रकाराचे चार, तर ‘बीए : ५’ उपप्रकाराचे तीन रुग्ण आढळून आले आहेत. हे उपप्रकार ओमिक्रॉन वंशावळीतील असून त्यामुळे विषाणू प्रसाराचा वेग काहीसा वाढतो, असे आंतरराष्ट्रीय अनुभवावरून लक्षात आले आहे. भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेने (आयसर) केलेल्या जनुकीय तपासणीत हे उपप्रकार आढळले आहेत. फरिदाबादच्या इंडियन बायोलॉजिकल डेटा सेंटर (आयबीडीसी) संस्थेने त्याला दुजोरा दिला आहे. सर्व रुग्ण पुणे शहरातील असून गेल्या ४ ते १८ मे या कालावधीत ते आढळून आले. यात चार पुरुष आणि तीन महिलांचा रुग्णांत समावेश आहे. त्यातील चार जण ५० वर्षांवरील आहेत. दोन जण २० ते ४० वर्षे वयोगटातील आहेत तर एक रुग्ण १० वर्षांखालील आहे.
दोन रुग्णांचा दक्षिण आफ्रिका आणि बेल्जियम प्रवासाचा इतिहास आहे. तीन जणांनी भारतात केरळ आणि कर्नाटक राज्यात प्रवास केला आहे. दोन रुग्णांना प्रवासाचा कोणताही इतिहास नाही. कोणालाही रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासली नाही. प्रत्येकाला गृहविलगीकरणात उपचार देण्यात आले. आता सर्व रुग्ण बरे झाले आहेत. मात्र, नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे.
दोन्ही डोस घेऊनही संसर्ग
नवीन व्हेरियंटचे आढळलेल्या रुग्णांमधील नऊ वर्षांचा एक मुलगा वगळता, इतर सर्वांनी कोविड लसीकरणाचे दोन्ही डोस घेतले आहेत. एकाने बूस्टर डोसही घेतला आहे. तरीही त्यातील सर्वांना कोविडची सौम्य लक्षणे जाणवली असल्याचे आरोग्य यंत्रणेमार्फत सांगण्यात आले.
नवीन व्हेरियंट आढळले असले, तरीही नागरिकांनी काळजी करण्याचे कारण नाही. या रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल देखिल करावे लागले नाही. हे सर्व रुग्ण आता खडखडीत बरे झाले आहेत.
-डॉ. संजीव वावरे सहायक आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका
Web Title: Todays Latest Marathi News Pne22r07305 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..