
''एमएसटी''धारकांची सामान्य प्रवाशांवर दादागिरी
पुणे, ता.२९ : डेक्कन क्वीनच्या ''एमएसटी''धारकांची (मंथली सिझन तिकीट) सहप्रवाशांवर दंडेलशाही सुरू आहे. एसी कोच असो वा सेकंड सीटिंग. दोन्ही डब्यांतील ''एमएसटी'' धारक रेल्वे आपल्या मालकीच्या असल्याच्या आविर्भावात वागत आहेत. एसी कोचमधून डायनिंग कारकडे जाणाऱ्या प्रवाशांना देखील ते अडवून त्यांची विचारणा करतात. तिकिटाची मागणी करतात. प्रवासी डब्याच्या दरवाज्यांवर थांबला असेल तर त्याला हुसकावून लावतात. गेल्या अनेक वर्षांपासून ''एमएसटी''धारकांची सामान्य प्रवाशांवर दादागिरी सुरू आहे.
सेकंड सिटिंगच्या डब्यांत देखील प्रचंड अरेरावी केली जाते. रेल्वे प्रशासनकडे याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मात्र अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. ''एमएसटी'' डब्यांत अन्य प्रवाशांना प्रवास करण्यास जसा मज्जाव आहे. तसे एमएएसटीधारकांनी देखील आरक्षित कोचमधून प्रवास करण्यावर बंदी आहे. मात्र, तरी देखील ''एमएसटी''धारक कुणाच्याही विरोधाला न जुमानता बिनदिक्कतपणे प्रवास करतात. प्रसंगी भांडणे करतात. कधी सीट वर बसला म्हणून तर कधी डब्यांत प्रवेश का केला म्हणूनही दादागिरी सुरू असते.
एमएसटीमध्ये जर अन्य प्रवासी आला तर त्याला तिकीट विचारण्याचे, हुसकावून लावण्याचे अधिकार एमएसटीधारकांना नाहीत. ते त्या प्रवाशांची तक्रार करू शकतात. मात्र, त्यांना तिकीट मागणे वा अन्य कोणत्याही प्रकारची विचारणा करण्याचा अधिकार नाही, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
डायनिंग कारमध्ये जाणार कसे?
सी १ डब्या नंतर डायनिंग कार आहे. त्यामुळे कोणत्याही श्रेणीचे तिकीट असलेल्या प्रवाशांना डायनिंग कारमध्ये जायचे असल्यास त्यांना सी एक मधून जावेच लागते. मात्र, आपल्या व्यतिरिक्त अन्य प्रवासी आढळून आल्यास त्याला तत्काळ रोखले जाते. मग प्रवासी डायनिंग कारमध्ये जाणार कसे? असा सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे.
एमएसटीधारकांच्या दंडेलशाही विषयी तक्रारी प्राप्त झाल्या आहे. गैरवर्तन असणाऱ्या प्रवाशांवर कारवाई केली जाईल. स्पेशल स्कॉड गाडीला नियुक्त केला जाईल.
- डॉ मिलिंद हिवरे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, पुणे.
कोणताही प्रवास कोणत्याही डब्यातून जाऊ शकतात. एमएसटीच्या प्रवाशांनी अन्य प्रवाशांच्या अडवणूक करणे चुकीचे आहे. तसा त्यांना नैतिक अधिकार नाही. अनेकदा एमएसटी प्रवासी आरक्षित डब्यांतून प्रवास करतात. तेव्हा त्यांना अशीच वागणूक दिली तर चालेल का?
-हर्षा शहा,अध्यक्षा, रेल्वे प्रवासी ग्रुप, पुणे.
अनेकदा एमएसटीवाल्यांना याबाबत समज दिली आहे. आमच्याकडे देखील याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. काही एमएसटी डब्यांत प्रवासी पत्ते व दारू पीत असताना आढळून आले आहेत. अशांवर कारवाई झाली पाहिजे.
-इकबाल मुलाणी, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड रेल्वे प्रवासी संघ
Web Title: Todays Latest Marathi News Pne22r07429 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..