पुणे-मुंबई द्रुतगतीची ‘दूरगती’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे-मुंबई द्रुतगतीची ‘दूरगती’
पुणे-मुंबई द्रुतगतीची ‘दूरगती’

पुणे-मुंबई द्रुतगतीची ‘दूरगती’

sakal_logo
By

प्रसाद कानडे : सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ३० ः कार्यालयीन कामानिमित्त मला आठवड्यातून दोन ते तीन वेळेस मुंबईला जावे लागते. पूर्वी अडीच ते तीन तासांत मुंबई गाठत. आता मात्र खंडाळा-लोणावळा गाठण्यासाठीच दोन-अडीच तास लागतात. टोलवरील रांगा, घाटात कारच्या लागणाऱ्या रांगांमुळे द्रुतगतीचा प्रवास आता नकोसा झाला. जर मार्गात अपघात झाला तर सांगण्याची सोयच नाही. टोल देऊनही नशिबी मनस्ताप आणि रेंगाळणारा प्रवास हेच असल्याची भावना व्यक्त करीत होते, या रस्त्यावरील नियमित प्रवासी संकेत जेसूदास.

संकेत हे गेल्या पाच-सहा वर्षांपासून कामानिमित्त पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून नियमित प्रवास करतात. त्यांच्यासारखीच व्यथा या रस्त्याचा वापर करणाऱ्या हजारो प्रवाशांची आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग उभारणीनंतर पुणे- मुंबई दरम्यानचा प्रवास सुपरफास्ट झाला. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या मार्गावरून प्रवास करणे ही वाहनधारकांना शिक्षा वाटत आहे. नेहमीच होणारी वाहतूक कोंडी, अपघातात होणारे मृत्यू, आदी कारणे याला कारणीभूत आहेत. पूर्वी अडीच-तीन तासांत होणार हा प्रवास आता पाच ते सहा तास लागले तरी संपत नाही. घाटात अपघात झाला तर मग तर कोंडीतच चार -पाच तास जातात. कोंडी सोडण्यासाठी ‘मलमपट्टी’ केली जाते, मात्र ठोस उपायांची वाणवाच आहे. त्यामुळे ''एक्स्प्रेस वे'' वरील वाहतूक कोंडी फुटणार कधी?, हा प्रश्न पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्या वाहन धारकांना भेडसावत आहे.

कुठे होते वाहतूक कोंडी :
पुण्याहून मुंबईला निघाल्यावर पहिल्यांदा कोंडी होणारे ठिकाण म्हणजे उर्से टोल नाका. त्यानंतर लोणावळा व खंडाळा घाट, आडोशीचा बोगदा, मग खालापूर टोल नाका. या ठिकाणी कोंडी झाली तर पाच ते सहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. मुंबईहून पुण्याला येताना खालापूर टोल नाका, लोणावळ्याहून बाहेर पडताना ‘बॉटल नेक’ तयार होतो ते ठिकाण, अमृतांजन पूल आदी ठिकाणी वाहतुकीची कोंडी नियमित होते.

कोणत्या वेळी होते कोंडी :
- पुण्याहून निघाल्यावर उर्सेजवळ सकाळी सात ते नऊ, खालापूरजवळ सकाळी १० ते ११ यावेळेत कोंडी होते.
- मुंबईहून निघाल्यावर दुपारी ५ ते रात्री १० या वेळेत ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होते.

रोज किती वाहने धावतात :

पुणे-मुंबई द्रुतगती (पोलिसांचा अंदाज)
६० हजार
दररोज दुतर्फा धावणारी वाहने

८० ते ९० हजार
शनिवार-रविवार धावणारी वाहने

पुणे-मुंबई द्रुतगती (टोल प्रशासन)

३० ते ४० हजार
दररोज दुतर्फा धावणारी वाहने

५० ते ६० हजार
शनिवार-रविवार धावणारी वाहने

अडीच कोटी रुपये
दररोज टोलमधून मिळणारे उत्पन्न

गेल्या २२ वर्षांपासून पुणे -मुंबई एक्स्प्रेस वे वरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविता आले नाही. यासाठी एमएसआरडीसी, आयआरबी, महामार्ग पोलिस हे दोषी आहेत. ९५ किमीच्या प्रवासासाठी प्रवाशांना २७० रुपये भरावे लागतात. एवढ्या कमी अंतरासाठी २७० रुपये घेणे हे भारतात केवळ पुणे -मुंबई मार्गावर घडत आहे.
- संजय शिरोडकर,
टोल अभ्यासक, पुणे

मी कधी एसटीने तर कधी टॅक्सीने हा प्रवास केला. वेळेत हा प्रवास पूर्ण झाला असा कधीच अनुभव आला नाही. या मार्गावर एक जरी वाहन बंद पडले तर तुमच्या नियोजनाचे तीन तेरा झाले असे समजा.
- प्रियांका कुलकर्णी, प्रवासी

तुमचा अनुभव काय?
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आपल्याला प्रवासाबाबत कसा अनुभव आला. याबाबत आपली प्रतिक्रिया नावासह editor.pune@esakal.com या मेलवर किंवा ८४८४९७३६०२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवा.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r07783 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top