
भविष्य चांगलं हाय, पण वर्तमानाचं काय?
ज्योतिषी ः नशीब, लई जोरात हाय तुमचं भाऊ. सुख, समाधान आणि बक्कळ पैसा देवानं लिहून ठेवलाय भाऊ. तुमच्या तळहातावरील रेषा सांगतायत, तुमच्या घराखाली धन आहे पण ते तुमच्या उपयोगास येत नाय भाऊ.
सुधीर ः खरं आहे महाराज ! माझ्या बिल्डिंगखालीच ‘एटीएम’ आहे पण त्याचा मला काहीही उपयोग होत नाही.
ज्योतिषी ः तुमच्या घराखाली धन आहे म्हणजे गुप्तधन हाये. ते काढल्यास, तुमी फार गब्बर होणार आहात भाऊ.
सुधीर ः महाराज, मी फ्लॅटमध्ये राहतो. तो खोदल्यास खालच्या मजल्यावरील फ्लॅटचा मालक माझ्या नावानं ठणाणा करील, त्याचं काय?
ज्योतिषी ः तुमच्या कुंडलीत भरपूर धन आहे, असं मला म्हणायचंय भाऊ
सुधीर ः महाराज, हे धन कुंडलीतून बॅंकेत कसं ट्रान्सफर होईल, तेवढं सांगा.
ज्योतिषी ः त्यासाठी तोडगा करावा लागतोय. देवाच्या नावानं ‘खर्चापाणी’ करावा लागतोय भाऊ !
सुधीर ः पाणीच खर्च करायचंय म्हणताय ना. करू की.
ज्योतिषी ः भाऊ, लाथ मारीन, तिथं पाणी काढणार, असा तुमचा स्वभाव हाये भाऊ !
सुधीर ः महाराज ! अगदी खरं बोललात. अनेकदा मी नोकरीवर लाथ मारली, त्यानंतर खर्च भागवताना माझ्या डोळ्यांत पाणी आलंय.
ज्योतिषी ः लई मोठं मन हाय तुमचं भाऊ, लोकं मात्र तुमचा फायदा घेतात भाऊ !
सुधीर ः महाराज, तुम्हीही त्यातलेच की.
ज्योतिषी ः आयुष्यात लई कष्ट तुमी केले भाऊ, कोणाबद्दल तुमी वाईट चिंतीत नाय. पण भाऊ ! तुमच्याविषयी लोकं वाईट करतेत भाऊ. पैसा लई कमवते तुमी भाऊ पण पैसा काय टिकत नाय. अनेकांकडं तुमचा पैसा पडून हाये भाऊ? तुमचा पैसा लोकं द्यायला तयार नाहीत. खरं की नाय भाऊ?
सुधीर ः शंभर टक्के खरं महाराज ! मोदी सरकारकडं माझे पंधरा लाख पडून आहेत. माझे पैसे द्यायला ते तयार नाहीत. काहीतरी ‘जुमला’ करा महाराज
ज्योतिषी ः लई मेहनत करून बी तुमचं काम होत नाय भाऊ. हातातोंडाशी आलेला घास निघून जातो भाऊ.
सुधीर ः लग्नामध्ये माझं नेहमी असं होतं. मी ज्या पंगतीला बसतो, त्यावेळी अनेकदा जेवण संपलेलं असतं. हातातोंडाशी आलेला घास निघून जातो, हे मी अनेकदा अनुभवलंय. त्यासाठी मी स्वतःच लग्न करायचं ठरवलंय. माझं लग्न कधी होईल, ते सांगा महाराज !
ज्योतिषी ः तुमच्या कुंडलीत सुख आणि केवळ सुखच लिहलंय. त्यामुळं तुमचं लग्न होईल, असं काही वाटत नाही भाऊ !
ज्योतिषी ः भाऊ, एक नड आहे तुम्हाला. तुमच्या जवळच्यांनीच तुम्हाला अडवून धरलंय भाऊ ! तुमच्या पायाखालची माती नेऊन, करणी केलीय तुमच्यावर भाऊ. पण काळजी करायची नाय भाऊ ! काळा आणि पांढरा कपडा कधी घालू नका भाऊ. घरात जर असंल, तर लगेच मला देऊन टाका भाऊ. ! मी तुमचं सगळं नीट करून देतो. फक्त पाच हजार रुपये खर्च करावा लागतोय भाऊ...
सुधीर ः महाराज, एवढे पैसे माझ्याकडे असते तर तुम्हाला हात दाखवला असता का? वेळही जाईना आणि पैसाही मिळंना, अशी माझी गत झालीया.
ज्योतिषी ः (चिडून) अरं हाच तुझा प्रॉब्लेम आसंल तर चल माझ्याबरोबर ! तुझा वेळही मजेत जाईल आणि चार पैसेही मिळतील.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22r07869 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..