‘हे’ अन् ‘ते’... जमलं एकदाचे! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘हे’ अन् ‘ते’...
जमलं एकदाचे!
‘हे’ अन् ‘ते’... जमलं एकदाचे!

‘हे’ अन् ‘ते’... जमलं एकदाचे!

sakal_logo
By

‘‘अगं ‘हे’ कुठं ठेवलंय?’’ श्रीपादने धनश्रीला विचारले. ‘हे’ म्हणजे काय? त्याला काय नाव वगैरे आहे की नाही?’’ धनश्रीने रागाने विचारले. श्रीपादला एखाद्या गोष्टीचं नाव पटकन आठवायचं नाही. मग त्याचं ‘हे’ कोठंय आणि ‘ते’ कोठंय? असं सुरू व्हायचं. अगदी लग्नातही उखाणा घेण्याच्या वेळेला त्याचा गोंधळ उडाला होता. धनश्रीचं नावच त्याला आठवण नव्हतं. मग ‘हिचं’ नाव घेतो, असं म्हणून त्याने वेळ मारून नेली होती. मात्र, धनश्रीच्या दूरच्या मामाला हा प्रकार काही पसंत पडला नव्हता.
‘‘ढमे, तुझ्या नवऱ्याला उखाण्यात नीट नाव घ्यायला सांग,’’ असं म्हणून मामांनी तंबी दिली होती. मग श्रीपादने ‘भाजीत भाजी मेथीची, ढमी माझ्या प्रीतीची’ असा उखाणा भर मांडवात वऱ्हाडी मंडळींच्या साक्षीने त्याने घेतला होता. तो ऐकून धनश्रीला ठसका लागला होता. तेव्हापासून घरात मेथीची भाजी आणि श्रीपादची डाळ काही शिजली नव्हती. आजही त्याचं ‘हे’ कोठंय गं, असं चाललं होतं. मग त्याने दिलेल्या अनेक पर्यायातून धनश्रीला नेमकं नाव ओळखायला लागायचं. या साऱ्या गोष्टीला ती वैतागून जायची.
‘‘अगं ते गं. शेजारच्या दिप्तीवहिनींकडं त्याच वस्तूच्या रंगांची साडी आहे. आता त्या स्वातंत्र्यदिनाला नेसल्या नव्हत्या का! त्यांना तो रंग एकदम खुलून दिसतो बघ.’’ श्रीपादने माहिती पुरवली.
‘‘तुम्हाला घरातली गोष्ट आठवत नाही आणि दुसऱ्यांच्या बायकोच्या साड्यांचा रंग बरा आठवतोय.’’ धनश्रीने रागाने म्हटले. ‘‘अगं एकदम पांढराशुभ्र रंग असतो. तुझ्या स्वभावासारखी चव असते.’’ श्रीपादने म्हटले.
‘‘साखर का?’’ धनश्रीने विचारले. ‘‘नाही गं, साखर तर गोड असते. तुझ्या स्वभावात कोठे गोडवा आहे? अगं माझ्या मनाला किंवा शरीराला लागलं की तू जखमेवर चोळतेस ते?’’ श्रीपादने विचारले. ‘‘अच्छा मीठ का?’’ धनश्रीने विचारले. ‘‘हं. अगदी बरोबर. मीठ कोठे ठेवलंय. तेच मी विचारतोय मघापासून पण तुझ्या लक्षातच पटकन काही येत नाही.’’ श्रीपादने म्हटले. त्यानंतर त्याने मुंग्यांना पळवून लावण्यासाठी वाटीभर मीठ गॅलरीत ठेवले.
‘घरात किंवा गॅलरीत मुंग्या झाल्या असतील तर वाटीभर मीठ मुंग्यांजवळ ठेवा,’ असं आताच मी व्हॉटसॲपवर वाचलं. म्हटलं प्रयोग करायला काय हरकत आहे? माणसानं कसं कायम प्रयोगशील असलं पाहिजे. तरच त्याची प्रगती होऊ शकते...’’ श्रीपादने म्हटले. ‘‘बरं आज नाश्त्यासाठी काय बनवू?’’ थोड्यावेळाने धनश्रीने विचारले. ‘‘अगं ‘ते’ कर ना. मस्त वाटतं खायला.’’ श्रीपादने म्हटले. ‘‘ते म्हणजे काय?’’ धनश्रीने विचारले. ‘‘अगं चित्रपटांमध्ये ‘तो’ असला की पिक्चर सुपरहिट होतो.’’ श्रीपादने म्हटले. ‘‘गाजर का हलवा’’ धनश्री म्हणाली.
‘‘अगं नाही गं. जेवण झाल्यानंतर पानटपरीवर जाऊन मी खातो ते पान गं.’’ श्रीपादने म्हटले. ‘‘आता तुम्ही कोणतं पान खाता मला कसं माहिती असणार?’’ धनश्रीने रागाने विचारले. ‘‘अगं ‘तो’ असल्याशिवाय पदार्थाला झणझणीतपणा येत नाही. तो गं.’’ श्रीपादने म्हटले. धनश्री म्हणाली, ‘‘अच्छा! मसाला होय.’’ त्यावर श्रीपादने मान डोलावली.
‘‘पण मसाल्याचं काय बनवू? मसाला पापड की मसाला भात? की...’’ तिने विचारले.
‘‘अगं ‘ते’ बनव. तू रोज चहाचा कप माझ्या हातात देताना काय म्हणतेस? ते बनव.’’ श्रीपादने म्हटले.
‘‘तुम्हाला चहा देताना मी रोज काय म्हणते? डोसा. अच्छा ‘मसाला-डोसा’ तुम्हाला हवाय का?’’ धनश्रीने म्हटले. ‘‘अगदी बरोबर!’’ बायकोनं बरोबर ओळखल्यावर श्रीपादच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. ‘‘आणि दुपारी जेवणात..!’’ पण जेवणातील पदार्थांची नावे श्रीपादकडून ऐकायला धनश्री जाग्यावर होती कोठे? ती केव्हाच कानात कापसाचे बोळे घालून किचनमध्ये गेली होती.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22x34628 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..