
‘सुरवर्धन’ने रंगविली ‘माणिक रत्ने’ मैफल
पुणे, ता. १७ : प्रख्यात गायिका माणिक वर्मा. त्यांच्या साध्या, सोप्या, भावमधुर गीतांनी मराठी माणसांच्या तीन-चार पिढ्यांचे सोज्वळ रंजन केले. १६ मे हा त्यांचा जन्मदिवस. हे औचित्य साधून ‘सुरवर्धन’ संस्थेतर्फे त्यांच्या तीस निवडक गाण्यांची ‘माणिक रत्ने’ ही मैफल आयोजित केली होती.
घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक केंद्रात झालेल्या या कार्यक्रमाची संकल्पना व निवेदन सुधीर पटवर्धन यांचे होते. भीमपलास रागावर आधारित ‘अमृताहुनी गोड नाम तुझे देवा’, या भक्तिगीताने वातावरण प्रसन्न केले. शास्त्रीय संगीतातील किराणा, आग्रा व अलाहाबाद घराण्याच्या गुरूकडून तालीम घेऊन नंतर स्वतःची शैली निर्माण करणाऱ्या माणिकबाईंची चित्रपटगीते व सुगमगीते घराघरांत गाजू लागली. या कार्यक्रमात अनंता अंत नको पाहू, कबिराचे विणतो शेले, उठ राजसा, घननीळा लडिवाळा, बहरला पारिजात, तुझ्या मनात कुणीतरी, हसले मनी चांदणे, निघाले आज तिकडच्या घरी आदी गीतांनी उपस्थित ज्येष्ठांना स्मरणरंजनात गुंतवून ठेवले.
डॉ. भक्ती दातार, अरुणा अनगळ, अदिती मांद्रेकर, अंजली पंढरपुरे, शोभा भावे, डॉ. अंजली दीक्षित, मेधा मेहेंदळे व अश्विनी मदाने यांनी ही गीते सादर केली. मुळात एकल स्वरात असलेली काही गीते या गायिकांनी दोघी-तिघींनी मिळून गाण्याचा प्रयोग, हे या कार्यक्रमातील वेगळेपण होते. गोपाळकृष्ण शिंगरे (हार्मोनियम), उल्हास कुलकर्णी (तबला) व नरेंद्र काळे (तालवाद्ये) या मोजक्या साथीदारांनी बहार आणली.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22y11518 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..