पद भरतीचा सरकारला पडला विसर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पद भरतीचा सरकारला पडला विसर
पद भरतीचा सरकारला पडला विसर

पद भरतीचा सरकारला पडला विसर

sakal_logo
By

पुणे, ता. १५ ः राज्य सरकारच्या भूमी अभिलेख विभागातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया तब्बल सात वर्षांनी जाहीर झाली आहे. त्यामुळे या विभागात नोकरीची संधी मिळू शकते. या विचाराने डिसेंबर २०२१ मध्ये राज्यातील सहा विभागात १०१३ पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध होताच अर्ज केला. परीक्षा २३ जानेवारी २०२२ होणार होती. त्यामुळे अभ्यासही सुरू केला. मात्र ही परीक्षा घेण्याचा विसर राज्य सरकारला पडला असून गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून परीक्षा होत नाही, त्यामुळे किती काळ अभ्यास करावा, असा प्रश्न पडला असल्याचे केदार पवार या विद्यार्थ्याने सांगितले.
भूमी अभिलेख विभागात भरती प्रक्रिया गेल्या सात वर्षांत झाली नाही. त्यामुळे या विभागाचा कामकाजाचा भार अपुरी कर्मचारी संख्या असल्याने वाढला आहे. त्यामुळे ही भरती प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविली जाऊन तत्काळ पदे भरली जातील असे वाटले होते. मात्र, ठाकरे सरकारच्या काळात सुरू झालेली भरती प्रक्रियेची माहितीच एकनाथ शिंदे सरकाला नसल्याचे दिसून येत आहे. सण उत्सवाला मुक्तपणे परवानगी दिली जात आहे. मात्र नोकर भरतीबाबत या पूर्वीच्या सरकारांप्रमाणेच शिंदे सरकार देखील उदासीन असल्याचे दिसून येत आहे, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

भूमी अभिलेख विभागात एकतर भरती होत नव्हती. सात वर्षांनी कुठे त्यांना भरती करण्याचे सुचले आहे. त्यात भरती प्रक्रिया अडकून पडली आहे. खुला प्रवर्गासाठी ३०० रुपये तर मागास प्रवर्गासाठी १५० रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात आले आहे. अर्ज डिसेंबर २०२१ मधे अर्ज स्वीकारण्यात आले असून अद्याप परीक्षेचे नियोजन सरकारला करता आले नाही.
- गणेश रक्ताटे, विद्यार्थी

परीक्षेचे अर्ज भरून आठ महिने उलटले आहेत, तरी अजून परीक्षेची तारीख नाही. या परीक्षेसाठी सुमारे ५० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले आहेत. तरुणांच्या आयुष्यातील उमेदीच्या काळाचा विचार करून ही परीक्षा लवकरात लवकर घ्यावी.
- राजश्री देवकाते, विद्यार्थिनी

परीक्षा होत नसल्याने विद्यार्थी नैराश्यात आहेत. सरकारी स्तरावर वरिष्ठांशी संपर्क साधला असता, कोणताही प्रतिसाद मिळत नाही. परीक्षेची तारीख लवकरात लवकर जाहीर करावी.
- दर्शन पाटील, विद्यार्थी

विद्यार्थी म्हणतात...
- २३ जानेवारी २०२२ ला होणारी परीक्षा राज्य सेवा परीक्षेमुळे पुढे ढकलली
- त्यानंतर आरोग्य विभागाच्या पद भरतीत घोटाळा झाल्याचे समोर आले
- शिक्षक भरतीमधील भ्रष्टाचाराचे प्रकरण चांगलेच गाजले
- ठाकरे सरकारने खासगी कंपन्यांकडून परीक्षा घेण्याचा निर्णय बदलला
- पुन्हा जिल्हा निवड मंडळाची स्थापना केली
- जिल्हा निवड मंडळाकडून खासगी कंपनीची नेमणूक करून भरतीचा निर्णय
- मात्र अद्याप कोणताही निर्णय नाही
- ठाकरे सरकार पडले
- शिंदे सरकार नोकरी भरती राबविण्याबाबत उदासीन

‘आम्हा काय त्याचे’ नको
निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजे. ज्यांच्यासाठी आपण काम करतो त्याचा लाभ संबंधितांपर्यंत पोचलाच पाहिजे. ‘आम्हा काय त्याचे’ भूमिका नको. आधीच कोरोनामुळे शैक्षणिक सत्रांचे वेळापत्रक कोलमडले आहे. त्यात सरकारी पातळीवर नोकरभरती प्रक्रिया रखडली असल्याने बिचारा विद्यार्थी भरडला जात आहे, याचा विचार व्हायला हवा. याबाबत आपल्या प्रतिक्रिया व सूचना नावासह editor.pune@esakal.com या मेलवर किंवा ८४८४९७३६०२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवा.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y25404 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..