बॉईज ३ चित्रपट परीक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बॉईज ३ चित्रपट परीक्षण
बॉईज ३ चित्रपट परीक्षण

बॉईज ३ चित्रपट परीक्षण

sakal_logo
By

नवा चित्रपट ः बॉईज ३
-----
धमाल विनोदी ‘रोड ट्रीप’
- संतोष भिंगार्डे
सध्या मराठी चित्रपटसृष्टीत एकापाठोपाठ एक सिक्वेल येत आहेत. आता ‘बॉईज’चा तिसरा भाग आला आहे. या चित्रपटाचा पहिला भाग २०१७मध्ये प्रदर्शित झाला. त्याला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. त्यानंतर त्याचा दुसरा भाग आला आणि त्याला उत्तम प्रतिसाद लाभला. आता आलेला तिसरा भागदेखील मजेशीर आहे. त्याला सुरेल संगीताची उत्तम साथ लाभलेली आहे. धैर्य, ढुंग्या आणि कबीर यांची उत्तम केमिस्ट्री जुळलेली आहे. हा चित्रपट म्हणजे धमाल कॉमेडीने भरलेली अशी रोड ट्रीप आहे. या रोड ट्रीपमध्ये अनेक गमतीजमती घडतात, त्यातून कथा पुढे सरकते आणि क्लायमॅक्सला कसे वेगळे घडते हे दिग्दर्शक विशाल देवरूखकरने छान दर्शविले आहे.
कथेत मैत्री कशी असावी, मैत्रीमध्ये एकमेकाला कशी मदत करावी, एकमेकांच्या सुख-दुःखामध्ये कसे सहभागी व्हावे असा एकूणच मैत्रीचा धागा छान गुंफण्यात आला आहे. धैर्य (प्रतीक लाड), ढुंग्या (पार्थ भालेराव) आणि कबीर (सुमंत शिंदे) यांची छान मैत्री असते, हे आपण पाहिलेले आहे. आता त्यांच्यामध्ये एक नवी मैत्रीण कीर्ती (विदुला चौगुले) आलेली आहे. कबीरची मावशी त्याला त्याच्या प्रॉपर्टीच्या कागदावर सही करण्यास कर्नाटकला जावे लागेल, असे सांगते. तेथे त्याचीच सही आवश्यक असल्यामुळे तो जाण्यास तयार होतो. तो त्याचे मित्र ढुंग्या आणि धैर्य यांना सोबत घेऊन जाण्यास निघतो. मध्येच त्यांना त्यांचाच एक मित्र नरू (ओंकार भोजने) भेटतो. नरूला त्याच्या वडिलांनी एक नवीन गाडी भेट दिलेली असते. त्याला फसवून त्याची गाडी घेऊन सर्वजण पुढील प्रवासासाठी निघतात. या प्रवासात त्यांची भेट कीर्तीशी (विदुला चौगुले) होते. सुरुवातीला कीर्ती आणि त्यांची शाब्दिक बाचाबाची होते. कीर्ती बेधडक आणि धडाकेबाज मुलगी असते. हळूहळू त्यांच्यात मैत्री होते. या मैत्रीमध्ये कबीर आणि कीर्ती एकमेकांकडे आकर्षित होत जातात. त्यांच्या मैत्रीच्या धाग्याचे रूपांतर प्रेमात होते का, कीर्ती नक्की कोण असते आणि ती अचानक कोठून येते, कबीर कर्नाटकात पोचतो का, ढुंग्या आणि धैर्या त्याला मदत करतात का या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी हा चित्रपट पाहावा लागेल.
दिग्दर्शक विशाल देवरूखकरने ही विनोदी कथा छान पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तीन मित्र, भेटणारी विविध माणसे, त्यांच्या लकबी आणि त्यातून होणारी विनोदनिर्मिती पाहता चित्रपट उत्साहवर्धक झाला आहे. कलाकारांच्या अभिनयाची आणि ठसकेबाज संगीताची साथ उत्तम लाभली आहे. सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतीक लाड यांनी अभिनयात कमाल दाखविली आहे. त्यांच्यातील काही संवाद हशा पिकविणारे आहेत. नवोदित अभिनेत्री विदुला चौगुले कमालीची भाव खाऊन गेली आहे. सुरुवातीला डॅशिंग आणि बिनधास्त, तसेच प्रेमासाठी हळवी झालेली कीर्ती तिने पडद्यावर छान रंगविली आहे. समीर चौगुले, विद्याधर जोशी, गिरीश कुलकर्णी, स्नेहल शिदम यांनी आपापल्या भूमिका छान वठविल्या आहेत. संगीतकार व गायक अवधूत गुप्तेने ठसकेबाज संगीत या चित्रपटाला दिले आहे. ‘लग्नाळू २.०’ या धमाल गाण्याने अगोदरच धुमाकूळ घातलेला आहे. त्याचबरोबर ‘चांद माथ्यावरी’ हे प्रमोशनल गाणेदेखील प्रेक्षकांना ठेका धरायला लावणारे आहे. त्यासाठी राहुल ठोंबरे आणि संजीव हौलदार या नृत्यदिग्दर्शकांचे कौतुक करावे लागेल. सिनेमॅटोग्राफर योगेश कोळीने आपल्या कॅमेऱ्यामध्ये कर्नाटक तसेच परिसरातील निसर्गरम्य दृश्ये छान टिपली आहेत.
------
छायाचित्र ः 92040
----

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y26015 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..