पावसात भिजल्या नोटा कमेंटचा भरला कोटा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावसात भिजल्या नोटा
कमेंटचा भरला कोटा!
पावसात भिजल्या नोटा कमेंटचा भरला कोटा!

पावसात भिजल्या नोटा कमेंटचा भरला कोटा!

sakal_logo
By

‘‘पावसात भिजल्याने माझ्याजवळील शंभर व पाचशेच्या नोटा भिजल्या आहेत. आता मी काय करू?’’ असा प्रश्‍न स्वरालीने फेसबुकवर टाकला. त्यानंतर ती झोपी गेली. मात्र, आपल्याच नोटा भिजल्या आहेत, असे समजून अनेकजण प्रतिक्रिया देण्यासाठी तुटून पडले.
‘‘भिजलेल्या नोटा वाळवण्यासाठी पिठामध्ये ठेवाव्यात. तासाभरानंतर त्या कडक होतात.’’ पी. सायलीने उत्तर दिले. सायलीकडून माहिती मिळाल्यानंतर अनेक तरुणांच्या आशा पल्लवीत झाल्या. त्यांनी तिला निरागसपणे प्रश्‍न विचारले.
‘‘कोणत्या पिठामध्ये ठेवाव्यात? बाजरी, ज्वारी की गव्हाच्या? की बेसनपीठही चालेल?’’
‘‘थेट गिरणीमध्ये जाऊन गरम पिठाचा वापर केल्यास, किती फरक पडेल?’’
‘‘भिजलेल्या नोटा पिठात ठेवल्यानंतर त्या पिठाचा उपयोग पुन्हा करता येऊ शकतो का? गव्हाचे पीठ असल्यास, त्यापासून आपण पुरणपोळ्या बनवू शकतो का?
या पिठाचे पराठे चांगले बनू शकतात का?’’
‘‘नोटा वाळवण्यासाठी बेसनपीठ वापरल्यास त्याची भजी किंवा वडे करता येईल का? दोन्हीपैकी कोणता पदार्थ चविष्ट होईल?’’
‘‘नोटा भिजल्यावर शक्यतो त्या पावडरीमध्ये ठेवाव्यात.’’ दिलखुलास प्राचीने उत्तर दिले.
‘‘कोणती पावडर? चहा पावडर?, स्नो- पावडर? मुंग्यांची पावडर? की दुधाची पावडर? कृपया पावडरीचा तपशील द्यावा.’’
‘‘बेसन पिठाच्या डब्यात नोटा ठेवून, त्यात दोन लिटर पाणी ओतावे. रात्रभर हे मिश्रण भिजत ठेवल्यास त्यानंतर त्याची खेकडा भजी करावीत. कुरकुरीत लागतात.’’
‘‘गव्हाच्या पिठात नोटा ठेवाव्यात. त्यानंतर हे मिश्रण अर्धातास गॅसच्या मंद आचेवर ठेवावे. नोटांचे काय होईल, हे सांगता येत नाही पण चपात्या मात्र गोलाकार आणि चविष्ट होतात.’’
‘‘भिजलेल्या नोटा तांदळाच्या डब्यात ठेवाव्यात.’’ स्नेहलने माहिती पुरवली.
‘‘त्यासाठी कोणते तांदूळ वापरावे? इंद्रायणी, आंबेमोहर, बासमती, सुरती कोलम, सोनम, कावेरी, रूपाली, वरंगळ, दिल्ली राईस की आणखी कोणते चालेल? याविषयी सविस्तर माहिती द्यावी.’’
‘‘सोनम, कावेरी, रूपाली ही मुलींची नावे आहेत की तांदळाचे प्रकार आहेत? ही नावे कशी पडली, याची जिज्ञासूंनी माहिती द्यावी.’’ जी. राजूने विचारले.
‘‘तांदळांच्या जातींना मुलींचीची नावे का दिली आहेत? टोमॅटोच्या जातीमध्येही वैशाली, शीतल, सोनाली अशी नावे दिली आहेत. तांदूळ किंवा टोमॅटोच्या जातींना मुलांची नावे दिली असती तर बिघडले असते का? हा पुरूषजातीचा अपमान नाही का?’’ पुरुषप्रधान योगेशने विचारले.
‘‘भिजलेल्या नोटा जपून ठेवून, नोटबंदीची वाट पाहावी.’’ भावी अर्थतज्ज्ञाने सल्ला दिला.
‘‘मी म्हणतो पाऊस केव्हाही कोसळेल, अशी सध्या परिस्थिती असताना घराबाहेर पडताना छत्री किंवा रेनकोट बरोबर ठेवावे. ओझे होत असल्यास मला आवाज द्यावा.’’
‘पाऊस येतोय. माझ्याकडे छत्री नाही,’ अशी पोस्ट टाकायला काय होते? आमच्यासारख्या तरुणांना सेवेची संधी कधी मिळणार?’’

‘‘घराबाहेर पडताना एवढी रोख रक्कम जवळ कशाला बाळगायची? ऑनलाइन व्यवहार करता येत नाहीत का? तुमच्या सारख्यांमुळेच भारतात डिजिटल क्रांती होत नाही.’’
‘‘तू पावसात भिजल्यामुळे तुला सर्दी होऊ शकते. मला फक्त आवाज दे. मी औषध व रुमाल घेऊन हजर होईल.’’
‘‘पावसात भिजून नोटा फाटल्या असतील तर मी त्या सगळ्या बदलून देईल. तरुण मुलींसाठी नोटा बदलून देण्याची एजन्सी मी ‘ना नफा, ना तोटा’ या तत्वावर चालू केली आहे. तातडीने कळवावे. ही स्कीम माझे लग्न होईपर्यंतच चालू राहील.’’
दुसऱ्या दिवशी सकाळी स्वराली उठल्यानंतर आपल्या पोस्टला एक हजार कमेंट मिळाल्याचे पाहून ती सुखावली. ‘‘पावसात भिजल्यामुळे डोकं जाम झालंय. आता मी काय करू?’’ असा प्रश्‍न फेसबुकवर टाकला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y26509 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..