क्षण बहराचे ः नेहमीच्या दृश्यांचे अनवट छायाचित्रण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्षण बहराचे ः 
नेहमीच्या दृश्यांचे अनवट छायाचित्रण
क्षण बहराचे ः नेहमीच्या दृश्यांचे अनवट छायाचित्रण

क्षण बहराचे ः नेहमीच्या दृश्यांचे अनवट छायाचित्रण

sakal_logo
By

पुणे शहर व परिसरातील कित्येक दृश्ये अभय कानविंदे यांच्या छायाचित्रांमधून वेगळीच वाटू लागतात. डेक्कन जिमखाना, सदाशिव पेठ, कोथरूड वगैरे भागांमधील घरे, दुकाने, रस्ते जणू त्यांच्या जगण्याची गोष्ट सांगू लागतात. मोबाइल फोनने केलेले छायाचित्रण एवढे चमत्कारिक वाटू शकते? या दृश्यांमधला अदृश्य आत्मा शोधण्याची अद्वितीय नजर कानविंदेंकडे आहे.
- नीला शर्मा

एखाद्या ठिकाणचे लोकजीवन व निसर्ग यांचा मेळ कानविंदेंच्या छायाचित्रांमधून लक्षात येतो. घरांचे छायाचित्रण करताना या माणसाने गर्दी, गजबज टाळली आहे. शांत, निवांत, जुनी, अनुभवी घरे त्यांच्या पोटात विविध रहस्ये पचवून उभी दिसतात. शेती, मातीत रमलेल्या स्त्रिया थरणीतूनच उगवून आल्यासारख्या वाटतात. ढग, पाऊस, पाणी, झाडे, फुले वगैरे तर मानवी वस्त्यांशी गूज करायला आल्यासारखी भासतात. ‘जाऊ तिथे माऊ,’ या मालिकेत तर, जनजीवनाचा अविभाज्य भाग झालेल्या ध्यानस्थ मनीमाऊचे दर्शन जागोजागी होते. या कलावंताने पुणे, नाशिक, बेळगाव आदी शहरांमधील साधे, सहज जीवनव्यवहार तरलतेने टिपले आहेत. कलात्मक, सौंदर्यपूर्ण, अभिजात आदी संकल्पनांच्या परीघाबाहेरचे रसरशीतपण अलवारपणे उलगडले आहे.

हे सारे कसे सुचले? कानविंदे म्हणाले, ‘‘मी इंटिरियर डिझायनर आहे. सात-आठ वर्षांपासून छायाचित्रणाचा छंद जडला. माझे काही मित्र छायाचित्रकार आहेत. त्यांचे काम बघायचो. मोबाइल फोन हातात आल्यावर, यातील कॅमेऱ्याने सहज छायाचित्रे काढू लागलो. रस्त्याने येता-जाताना किंवा कोठे थांबलो असेन तर बसल्या जागी भरपूर छायाचित्रे घेत राहिलो. पुणे शहराची सुमारे पंधरा हजार छायाचित्रे आजवर काढली आहेत. चांदणी चौक, विमाननगर, कोंढवा, काळेवाडी, वाघोली वगैरे भागांतील मिळून पंचवीस हजारांवर आहेत. फक्त सायकलवाल्यांचीच सुमारे पंधरा हजार असतील. त्यातही सायकल चालवणाऱ्या महिलांचीही बरीच छायाचित्रे आहेत. एकेका सूत्रावर आधारित अनेक मालिका केल्या. उदाहरणार्थ जिने, दारे, खिडक्या, फुले, पाने, रस्त्यावर फुले विकणारे, हातगाडी ओढणारे, वयस्कर स्त्री- पुरुष वगैरे. डेक्कन जिमखाना परिसरातील बंगल्यांचे छायाचित्रण हे, जुन्या काळातील वास्तुरचनेच्या वारशाची नोंद म्हणून केले. नऊवारी लुगडे नेसलेल्या स्त्रियांची मालिका केली. अत्यंत खडतर, दगदगीचे आयुष्य कंठताना सोयिस्कर म्हणून त्यांचा तो पोशाख आहे. कोठेही शोभिवंतपणा, दिमाख अथवा बडेजावासाठी तो पेहराव नाही, हे या परंपरेतील मर्म असावे. या छायाचित्रांमधून जनसामान्यांचे जगणे मांडता आले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y27116 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..