सहकारी बँकांच्या अनुदानात अर्धा टक्का कपात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सहकारी बँकांच्या अनुदानात अर्धा टक्का कपात
सहकारी बँकांच्या अनुदानात अर्धा टक्का कपात

सहकारी बँकांच्या अनुदानात अर्धा टक्का कपात

sakal_logo
By

पुणे, ता. २१ : जिल्हा बँकांना देण्यात येणाऱ्या व्याज सवलत योजनेत केंद्र सरकारकडून कपात केली आहे. त्यामुळे दोन टक्क्यांऐवजी दीड टक्के एवढेच व्याज केंद्राकडून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला (पीडीसीसी) अनुदान मिळणार असल्यामुळे बँकेला अल्पमुदत पीककर्ज वाटपात अडचणी निर्माण होणार आहेत. परिणामी पुणे जिल्ह्यातील दोन ते अडीच लाख शेतकरी हे राज्य शासनाच्या डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेला अपात्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

प्राथमिक शेती संस्थांचे थेट सभासदांना बँकेमार्फत तीन लाखापर्यंत शून्य टक्के व्याज दराने कर्जपुरवठा करण्यात येत आहे. हे कर्ज सहा टक्के व्याजदराने देणे जिल्हा बँकांना शासन निकषानुसार बंधनकारक आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून २.५ टक्के आणि केंद्र शासनाकडून दोन टक्के व्याज परतावा, असा एकूण ४.५ टक्के व्याज परतावा बँकेला प्राप्त होतो. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका शून्य टक्के व्याजदराने कर्जपुरवठा करू शकत होत्या. मात्र, नाबार्डने चालू वर्षी ८ सप्टेंबरमध्ये काढलेल्या परिपत्रकानुसार केंद्र शासनाकडून बँकेला दोन टक्क्यांऐवजी चालू आर्थिक वर्षात आणि २०२३-२४ या वर्षाकरिता १.५ टक्के एवढेच व्याज अनुदान म्हणून बँकेला प्राप्त होणार आहे, असे म्हटले आहे.
राज्य शासनाच्या डॉ. पंजाबराव देशमुख अल्पमुदत पीककर्ज व्याज सवलत योजनेनुसार नियमित परतफेड करणाऱ्या सभासदाला बँकेमार्फत कमाल सहा टक्के व्याजदर आकारणी बंधनकारक आहे. केंद्र शासनाच्या पत्रानुसार दोन टक्क्यांऐवजी दीड टक्का व्याज परतावा बँकेला देण्याचे सूचित केल्याने बँकेला तोटा होणार आहे. जर बँकेने संस्थेला ०.५ टक्के व्याजदर वाढवला आणि संस्थेने त्यांच्या सभासदांना त्याप्रमाणातच ०.५ टक्के व्याजदर वाढविल्यास अंतिम सभासदाला व्याजदर हा ६.५ टक्के एवढा होऊ शकतो. त्यामुळे जिल्ह्यातील नियमित पीककर्ज घेणारे दोन लाख ते अडीच लाख शेतकरी हे राज्य शासनाच्या डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेला पात्र होऊ शकणार नाहीत, असे बँकेकडून कळविण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y27718 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..