बायको, मीटिंग, ती अन् आत्या! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बायको, मीटिंग,
ती अन् आत्या!
बायको, मीटिंग, ती अन् आत्या!

बायको, मीटिंग, ती अन् आत्या!

sakal_logo
By

प्राजक्ताचा दोन वेळा फोन कट करूनही, तिचा तिसऱ्यांदा फोन आल्यावर धनंजय चांगलाच वैतागला. फोन घेत तो हळू आवाजात म्हणाला, ‘‘अगं मी एका मोठ्या मिटिंगमध्ये आहे. दोनवेळा फोन कट केला. त्यावेळी मी महत्त्वाच्या कामात गुंतलेलो असेल, एवढी साधी गोष्ट लक्षात येत नाही का?’’ त्याने चिडून म्हटले.
‘‘अहो, तुम्ही गेल्यानंतर घर खायला उठतं. म्हटलं एक-दोन मिनिटं नवऱ्याशी बोलावं तर तुमची बिझीची कॅसेट सुरू होते. लग्नानंतरच्या पहिल्या वर्षात कसं दहा-दहा मिनिटांनी फोन करून, ‘चहा झाला का? नाश्‍ता केला का? जेवण झालं का? असं सारखं विचारायचा. त्यावेळी किती आत्मीयतेने काळजी घ्यायचा. आता मात्र तुमचं माझ्यावर प्रेमच राहिलं नाही.’’ प्राजक्ताने म्हटले. त्यावर वैतागून धनंजय म्हणाला, ‘‘काय काम आहे, ते लवकर सांग. मी महत्त्वाच्या मुद्यावर चर्चा करतोय.’’ धनंजयने म्हटले.
‘‘आज किती वाजता घरी येणार आहात?’’ तिने विचारले. त्यावर मात्र धनंजयच्या रागाचा पारा आणखी चढला.
‘‘फक्त एवढं विचारण्यासाठी तू फोन केला आहेस का? दुसरं काही विचारता येत नाही का?’’ धनंजयने म्हटले.
‘‘आपला पिंटू कोणत्या इयत्तेत शिकत आहे?’’ प्राजक्ताने दुसरा प्रश्‍न विचारला.
‘‘घरी येण्यासाठी रात्रीचे दहा होतील.’’ धनंजयने विषय बदलत म्हटले.
‘‘एवढी कसली महत्त्वाची मीटिंग आहे हो?’’ प्राजक्ताने विचारले.
‘‘कंपनीच्या जुन्या क्लाईंटसोबत मीटिंग सुरू आहे. पंधरा वर्षापूर्वी या क्लाईंटची आणि आमच्या कंपनीची खूप मैत्री होती. मात्र, कंपनीच्या मातृसंस्थेने या क्लाईंटबरोबर यापुढे कोणतेही व्यवहार होणार नाहीत, असे जाहीर केले. त्यामुळे कंपनीलाही जुन्या क्लाईंटला सोडून, नव्या क्लाईंटबरोबर हातमिळवणी करावी लागली. तेव्हापासून कंपनी व जुना क्लाईंट कायमचे विभक्त झाले. मात्र, आज अचानक या जुन्या क्लाईंटने मैत्रीचा हात पुढे केला आहे. आमच्या कंपनीच्यादृष्टीने ही बाब अतिशय फायदेशीर आहे. त्यामुळे आमची महत्त्वाची बोलणी सुरू आहेत. सध्या आम्ही जुन्या आठवणींत रमलो आहोत. आमच्यातील बोलणी यशस्वी झाल्यास माझ्यावरील कामाचा बोजा आणखी वाढू शकतो. त्यामुळे घरी येण्यासाठी अनेकदा उशीर होऊ शकतो.’’ धनंजयने एका दमात सगळी माहिती दिली.
‘‘बरं. व्हॉटसॲपवर कॉल करता का? कोणता क्लाईंट आहे, ते मला बघायचेय.’’ प्राजक्ताने म्हटले.
‘‘गोपनीयतेचा भंग होईल, असं आम्हाला काहीही करता येणार नाही आणि क्लाईंटलाही ते अजिबात आवडणार नाही. कंपनी ॲक्टप्रमाणे बैठकीचा तपशीलही कोणालाही देता येणार नाही. अगदी बायकोलासुद्धा. त्यामुळे आता फोन बंद कर.’’ धनंजयने म्हटले.
‘‘बरं आता तुम्ही कोठे आहात?’’ प्राजक्ताने म्हटले.
‘‘कोठे म्हणजे? ऑफिसच्या मिटिंगरूममध्ये.’’ धनंजयने म्हटले.
‘‘हॉटेल वेदांतमध्ये तुमची ऑफिसची मिटिंगरूम हलवली आहे, हे तुम्ही कधी मला सांगितलं नाही. सध्या मी मुलांसोबत तिथे जेवणासाठी आले आहे. तुमची जिथे मिटिंग चालू आहे ना, तेथून मागील दहाव्या टेबलवर आम्ही बसलोय. मुलं सारखी विचारत आहेत, की पप्पांसोबत बॉबकट केलेली आत्या कोण आहे? ’’ प्राजक्ताने म्हटले. यावर मात्र धनंजय ‘ततपप’ करू लागला.
‘‘अगं ती वेदिका आहे. आम्ही एकाच कॉलेजमध्ये होतो...’’ धनंजयने घाबरत म्हटले.
‘‘तुमची मीटिंग निवांत चालू द्या. फक्त घरी येताना कापूस आणि आयोडिन घेऊन या. नंतर धावपळ नको.’’ असं म्हणून प्राजक्ताने फोन बंद केला.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y27999 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..