Weather Update : राज्यात पावसाचा जोर ओसरला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Weather Update
राज्यात पावसाचा जोर ओसरला

Weather Update : राज्यात पावसाचा जोर ओसरला

पुणे : राज्यात पावसाचा जोर ओसरला असून विदर्भात काही जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी (ता. २३) विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. मध्य भारतातील कमी दाब क्षेत्रामुळे ही स्थिती पाहायला मिळत आहे. राज्यात गुरुवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भात बऱ्याच तर कोकणात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली होती. उर्वरित राज्यात पावसाने काढता पाय घेतला आहे. सध्या बंगालचे उपसागर ते राजस्थान असा हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. दरम्यान मॉन्सूनच्या परतीचा प्रवास वायव्य भारतातून सुरू झाला असून राजस्थान येथील बिकानेर, जोधपूर तसेच गुजरातच्या काही भागातून मॉन्सूनने माघार घेतली आहे. त्यातच मध्य प्रदेश व लगतच्या परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे.

यामुळे राज्यात ढगाळ वातावरणाचे सावट कायम असून उकाडा काहीसा जाणवू लागला आहे. हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार राज्यात बहुतांश भागात पावसाची मुख्यतः उघडीप राहणार असून विदर्भात मात्र मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शहरात गुरुवारी (ता. २२) हवामान कोरडे होते. कमाल तापमानात सरासरीपेक्षा किंचित घट पाहायला मिळाली. शहरात २८.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दरम्यान हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या मंगळवारपर्यंत (ता. २७) पुणे व परिसरात आकाश अंशतः ढगाळ राहून अत्यंत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

पावसाचा यलो अलर्ट
भंडारा, चंद्रपूर, बुलडाणा, अकोला, यवतमाळ, वाशीम, अमरावती, नागपूर, वर्धा, गडचिरोली, गोंदिया येथे शुक्रवारी (ता. २३) यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y28010 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..