पीपल ट्री परीक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पीपल ट्री परीक्षण
पीपल ट्री परीक्षण

पीपल ट्री परीक्षण

sakal_logo
By

नवा चित्रपट
पीपल ट्री
हेलावून टाकणारा, सच्चा अनुभव

- महेश बर्दापूरकर
विकासाच्या, प्रगतीच्या भ्रामक कल्पना घेऊन मनुष्य जगतो आहे आणि तसं करताना पर्यावरणाचं, निसर्गाचं, पृथ्वीचं आपण काय नुकसान करतो आहे याचं भान त्याला बिलकूल नाही. या परिस्थितीत तुमच्या-आमच्या डोळ्यात अंजन घालणारं, खरंतर एक जोरदार चपराक देण्याचं काम क्रांती कानडेसारखे संवेदनशील चित्रकर्मी करतात. क्रांतीच्या ‘पीपल ट्री’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटात झाडं वाचवण्याच्या गरजेबद्दल, त्यासंबंधीच्या कायद्यांबद्दल, चळवळींबद्दल आणि सामान्य माणसांच्या त्यातील खारीच्या वाट्याबद्दल सांगितलं गेलंय. चित्रपटातील प्रत्येक फ्रेम तुम्हाला खोल विचार करायला भाग पाडते आणि शेवट तुमच्या डोळ्याच्या कडा ओलावते...
क्रांतीच्या ‘पीपल ट्री’ची सुरवात पुण्यातील अभिमानश्री या उच्चभ्रू सोसायटीजवळच्या मोकळ्या जागेत पालिकेतर्फे सुरू झालेल्या वृक्षतोडीपासून होते. कथेचा नायक ‘तो’ (क्रांती रानडे) या प्रकारानं अस्वस्थ होऊन पोलिसांकडं तक्रार करू पाहतो. पालिका प्रशासन मोकळ्या जागेत झाडं लावायची परवानगी कोणी दिली असं सांगत त्याच्यावरच अतिक्रमणाचा खटला चालवू पाहतात. पोलिसही झाडं तोडण्यासाठी शिक्षेचं कोणतं कलम असल्याचं आपल्याला माहिती नसल्याचं सांगत हात वर करतात. त्याची पत्नी ‘ती’ (ईशा ठाकेर) न्यायासाठी त्याच्याबरोबर रस्त्यावर उतरते. तो झाडं तोडण्यासंबंधीच्या कायद्यांबद्दल जाणून घेण्यासाठी माहिती अधिकारी कार्यकर्ता विनोद जैन याच्याकडं धाव घेतो आणि त्याला अनेक कायद्यांची माहिती होते व या आंदोलनाला आता चांगलीच धार चढते. ‘माझ्या परिसरातील पिंपळाचे झाड कापल्यास मी हे शहर सोडून जाईल,’ अशी प्रतिज्ञा तो करतो आणि रस्त्यावरच्या या लढाईत त्याला अनेक साथी मिळत जातात...
चित्रपट एका माहितीपटाच्या अंगानं पुढं सरकत असला, तर त्याला एक प्रवाही कथा आहे. झाडच कथेचा नायक असल्यानं इतर पात्रांना नावं दिली गेलेली नाहीत, ती गौण आहेत. आमच्या दारातलं, परिसरातलं एखादं झाड तोडलं जातं, तेव्हा आपण क्षणभर दुःख व्यक्त करून आपापल्या कामाला लागतो. मात्र, एखादाच संवेदनशील माणूस त्याचा पाठपुरावा करतो. मात्र, त्याला विविध कायदे, नियम जाणून घेण्यासाठी व गेंड्याची कातडी पांघरलेल्या प्रशासनाशी लढण्यासाठी वेळ काढणं अशक्य बनतं. माहिती अधिकार कार्यकर्ताच्या तोडचं एक वाक्य महत्त्वाचं आहे. तो म्हणतो, ‘‘मी कायद्याची लढाई लढून चार हजार झाडं वाचवली आहेत, मात्र घाम गाळून हजार झाडं लावणाऱ्याचं कामही तेवढंच महत्त्वाचं आहे. दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.’’ कथेच्या ओघात असे अनेक प्रसंग येतात, जे तुम्हाला आतून हादरवतात. झाडं ‘मारण्यासाठी’चे लोकांचे प्रयोग चीड आणतात, हे प्रकार रोखण्यासाठी रात्रंदिवस झगडणाऱ्यांचे संपूर्ण आयुष्य बरबाद होताना पाहून तुम्हाला असहाय वाटू लागतं...चित्रपटाच्या शेवटी एक कापलेल्या झाडाच्या खोडावर ठेवलेली छोट्या झुडपाची कुंडी तुम्हाला अंतर्बाह्य हेलावून टाकते आणि ही चळवळ सोपी नसली, तरी चालूच राहावी असं प्रत्येकाला वाटतं... हेच चित्रपटाचं खरं यश ठरतं.
कलाकारांनी कोणताही अभिनय न करता केवळ भूमिका जगल्या आहेत. कधी हॅण्डीकॅम, तर मोबाईल कॅमेरावरही चित्रण करण्यात आलं असलं, तरी कथेची परिणामकारता थेट पोचते. दिग्दर्शक क्रांती कानडे यांनी हा पट उभा करण्यासाठी घेतलेले कष्ट प्रत्येक फ्रेममध्ये जाणवत राहतात. हा अविस्मरणीय अनुभव एकदा नक्कीच घ्या...
----
छायाचित्र ः ९३३६०
------

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y28217 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..