राष्ट्रवादीमध्ये राजकीय स्फोट होणार : चंद्रशेखर बावनकुळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrasekhar
Bawankule
राष्ट्रवादीमध्ये राजकीय स्फोट होणार ः बावनकुळे

राष्ट्रवादीमध्ये राजकीय स्फोट होणार : चंद्रशेखर बावनकुळे

पुणे : महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवार यांना गृहमंत्रीपद हवे होते, मात्र त्यांची योग्यता असूनही ते त्यांना दिले गेले नाही. राष्ट्रावादीमध्ये सध्या अंतर्गत धुसफूस आहे. लवकरच एक दिवस राष्ट्रवादीत राजकीय स्फोट होईल, असे भाकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. बावनकुळे यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. अजित पवार यांनी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या बैठकीत ‘मला गृहमंत्री पद हवे होते पण आमच्या वरिष्ठांनी दिले नाही’ असे वक्तव्य केल्यावरून बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मधील मतभेदांवर बोट ठेवले. अजित पवार यांना काँग्रेस व शिवसेनेनेही गृहमंत्रिपद देऊ दिले नाही. म्हणून राज्य अडीच वर्ष मागे पडले, असेही बावनकुळे म्हणाले.

केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांच्या दौऱ्याबाबत बावनकुळे म्हणाले, १४४ मतदारसंघामध्ये मंत्र्यांचे दौरे सुरू आहेत. त्याच निमित्ताने बारामती मध्ये सीतारामन यांचा दौरा झाला. आगामी निवडणुकीमध्ये आम्हाला बारामतीमध्ये राष्ट्रवादी घड्याळ बंद पाडायचे आहे. त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. आदित्य ठाकरे यांचे तळेगाव येथील आंदोलन म्हणजे ‘खोटं बोल पण रेटून बोल’ असा प्रकार आहे. महविकास आघाडी सरकारने जागा नक्की केली असेल तर मग त्यांनी ‘एमओयू’, जागा आरक्षीत केल्याचा आदेश घेऊन आंदोलनाला यावे, कंपनीला दिलेली प्रत दाखवावी. महाविकासआ घाडीमुळे दिरंगाई झाली आहे. मुख्यमंत्री मंत्रालयात आलेच नाहीत. त्यामुळे लवकर निर्णय झाला नाही. दिशाभूल करू नका, असे बावनकुळे म्हणाले.

एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाबाबत मला कोणतीही माहिती नाही. आमच्याकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही. अमित शहा यांना भेटले असतील ते मला माहिती नाही, मात्र राजकारणात काय होईल सांगता येत नाही, असे बावनकुळे यांनी सांगितले.

‘पीएफआय’वर बंदी घाला

‘पाकिस्तान झिंदाबाद’ म्हणणारे शोधून काढून त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना भेटून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी करणार आहे. आमचे सरकार संवेदनशील सरकार असून कारवाई नक्की होईल, असे बावनकुळे यांनी सांगितले.