मानव-वन्यजीव संघर्षाबाबत संवेदनशीलता आवश्यक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मानव-वन्यजीव संघर्षाबाबत संवेदनशीलता आवश्यक
मानव-वन्यजीव संघर्षाबाबत संवेदनशीलता आवश्यक

मानव-वन्यजीव संघर्षाबाबत संवेदनशीलता आवश्यक

sakal_logo
By

पुणे, ता. २५ ः वन्यजीव मानवी वस्तीत शिरतात, त्यावेळी संयमाने परिस्थिती हाताळण्याची गरज आहे. या वन्यजीवांना पाहण्यासाठी होणारी नागरिकांची गर्दी आणि त्याला हातभार लावणारे माध्यमांचे बेजबाबदार वार्तांकन, यामुळे ते घाबरतात आणि परिणामी त्यांना जीव गमवावा लागतो. हे टाळण्यासाठी सर्वच घटकांमध्ये संवेदनशीलता अत्यंत गरजेची आहे, असा सूर ‘नगररचना आणि वन्यजीव’ या विषयावरील चर्चासत्रात रविवारी उमटला.

फ्रेंड्स ऑफ इकॉलॉजिकल सोसायटी आणि किर्लोस्कर वसुंधरा यांच्यातर्फे या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यात पुणे विभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील, ‘सकाळ’चे संपादक सम्राट फडणीस, ‘पीएमआरडीए’च्या वरिष्ठ प्लॅनर रक्षदा रोडे व नगररचना अभ्यासक श्रध्दा मांजरेकर सहभागी झाल्या होत्या. इकॉलॉजिकल सोसायटीचे विश्वस्त डॉ. गुरुदास नूलकर यांनी सर्वांशी संवाद साधला.

पाटील म्हणाले, ‘‘आजही ग्रामीण भागात प्राणी मानवी वस्तीत आले तरी सहजपणे परत जातात. शहरात तशी परिस्थिती नाही. कुत्रा वाटेत आला तरी आपण दगड हातात घेतो. बिबट्यासारखा वन्यप्राणी वस्तीत आला, तर आपण भयंकर घाबरतो. कारण आपली प्राण्यांविषयीची संवेदनशीलता हरवली आहे. सध्यातरी ‘सहजीवन’ हाच मानव-वन्यजीव संघर्षावरचा उपाय आहे.’’ फडणीस म्हणाले, ‘‘मानवी वस्तीत वन्यजीव शिरल्याच्या घटना घडल्यानंतर माध्यमांनी वार्तांकन करताना संवदेनशीलतेपेक्षा सनसनाटीवर अधिक भर दिला. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कायदा करण्याची गरज आहे. माध्यमांनी त्यांची जबाबदारी नीट पार पाडण्याची तसेच लोकांनीही त्यांची नाराजी स्पष्टपणे पोहचवण्याची गरज आहे.’’

‘‘वन्यप्राण्यांच्या अधिवासावरील अतिक्रमण हेच मानव-वन्यजीव संघर्षाचे मूळ कारण आहे. आपल्याला विकास हवा आहेच. त्यामुळे काही अतिक्रमणे अटळ आहेत. मात्र पर्यावरणाला हानी पोहचणार नाही, यासाठी त्याच्या मर्यादा आखायला हव्यात’’, असे रोडे यांनी सांगितले.

रानगव्याच्या घटनेवरील लघुपट

चर्चासत्रापूर्वी इकॉलॉजिकल सोसायटीचे माजी विद्यार्थी व पत्रकार अनुप जयपूरकर निर्मित ‘ॲनिमल इन दी सिटी’ हा लघुपट दाखवण्यात आला. ९ डिसेंबर २०२० रोजी कोथरूड भागात अनपेक्षितपणे एका रानगव्याने प्रवेश केला. त्याला पाहायला आलेल्या प्रचंड जमावामुळे घाबरलेला रानगवा धावत सुटला, पण शेवटी भीतीने आणि दमछाकीने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. याच प्रसंगावर हा लघुपट आधारलेला आहे.

तज्ज्ञांनी केलेल्या सूचना ः
- वन्यजीव मानवी वस्तीत आल्यास संयमाने परिस्थिती हाताळणे
- वन्यजीव पाहण्यासाठी गर्दी करणे टाळावे
- बचाव पथकाला सहकार्य करणे
- माध्यमांनी जबाबदारीने वार्तांकन करणे
- वार्तांकनासाठी कायदेशीर निर्बंध लावणे
- पर्यावरण, वन्यजीवन याचा शैक्षणिक अभ्यासक्रमात समावेश करणे
- वन्यजीव अधिवासाचे संरक्षण करणाऱ्या व्यक्तींना विशेष प्रोत्साहन देणे
: PNE22S93837