
रिक्षा संघटनेकडून टेरिफ ॲपची निर्मीती
पुणे, ता. २५ ः रिक्षा मीटर कॅलिब्रेशनसाठी लागणाऱ्या रांगा, आरटीओ प्रशासनाने टेरिफ कार्डसाठी केलेली दिरंगाई लक्षात घेत, बघतोय रिक्षावाला संघटनेने सर्व रिक्षा चालकांसाठी मोफत टेरिफ ॲप बनविले आहे. १२ तासात ९२७ रिक्षा चालकांनी हे ॲप गूगल प्लेस्टोरवरून डाउनलोड केले असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी दिली.
पुणे शहरात १ सप्टेंबर रोजी नवीन रिक्षा दरवाढ लागू केली. तेव्हापासून मीटर कॅलिब्रेशनला सुरवात झाली. मात्र त्यास लागणार वेळ लक्षात घेता आतापर्यंत केवळ ७ हजारांपर्यंत रिक्षाच्या मीटरचे कॅलिब्रेशन झाले आहे. दरम्यान आरटीओ प्रशासनाने टेरिफकार्ड परवानगी दिली नव्हती. १३ सप्टेंबरला मात्र टेरिफ कार्डचे वापरण्यास परवानगी देऊन त्याचे दरही जाहीर करण्यात आले. मात्र यास दिरंगाई झाल्याचे सांगून बघतोय रिक्षावाला संघटनेच्या वतीने टेरिफ ॲप विकसित केले आहे. ते गुगल प्लेस्टोअर मोफत उपलब्ध असल्याचे डॉ. क्षीरसागर यांनी सांगितले.