नागरिकांनी जवळून अनुभवले ‘संस्कृत विश्वकोश’ निर्मितीचे टप्पे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नागरिकांनी जवळून अनुभवले ‘संस्कृत विश्वकोश’ निर्मितीचे टप्पे
नागरिकांनी जवळून अनुभवले ‘संस्कृत विश्वकोश’ निर्मितीचे टप्पे

नागरिकांनी जवळून अनुभवले ‘संस्कृत विश्वकोश’ निर्मितीचे टप्पे

sakal_logo
By

पुणे, ता. २५ :
जगातील सर्वात मोठ्या संस्कृत शब्दांच्या विश्वकोशाचे कामकाज कसे चालते, त्याच्या निर्मितीमधील वेगवेगळे टप्पे, आतापर्यंत प्रकाशित झालेले खंड याचा उलगडा नागरिकांना झाला, ते ‘ओपन डे’च्या निमित्ताने. होय, डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्थेच्या (अभिमत विद्यापीठ) संस्कृत आणि कोशशास्त्र विभागातर्फे आयोजित ‘ओपन डे’ कार्यक्रमात ‘संस्कृत विश्वकोश’ हा प्रकल्प एका दिवसासाठी सर्वांसाठी खुला ठेवण्यात आला होता, त्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी कोशनिर्मिती कशी होते याची सविस्तर माहिती आणि ते काम प्रत्यक्ष पाहण्याची संधी नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली होती. यावेळी संस्थेचे कुलगुरू डॉ. प्रमोद पांडे, संस्कृत विश्वकोशाचे प्रधान संपादक डॉ. प्रसाद जोशी उपस्थित होते. ‘‘नवीन शैक्षणिक धोरणामध्ये संस्कृतला असलेले महत्त्व लक्षात घेता डेक्कन कॉलेजमध्ये तयार होणारा संस्कृत विश्वकोश हा लक्षणीय ठरतो.’’ संस्कृतमधील शब्दांचा तयार होणारा हा आगळावेगळा आणि विशाल कोश लोकांना पाहता यावा, तसेच संस्कृत साहित्यामध्ये उपलब्ध असणारा ज्ञानाचा ठेवा लोकांपुढे यावा आणि त्याचा प्रसार व्हावा हा कार्यक्रमामागील उद्देश होता, असे डॉ. जोशी यांनी सांगितले.
ऋग्वेदापासून ते १९ व्या शतकातील ग्रंथांपर्यंत जवळजवळ १५०० संस्कृत ग्रंथांमधून एक कोटी संदर्भांचे संकलन करून तयार केलेले ‘स्क्रिप्टोरिअम’ हे या प्रकल्पाचे वैशिष्ट्य आहे. या कोशात १९४३ ते १९७६ पर्यंत अनेक संस्कृत विद्वानांनी वेद, वेदांत, दर्शन, अर्थशास्त्र, धर्मशास्त्र, गणित, रसायनशास्त्र, कृषिशास्त्र, शिल्पशास्त्र अशा तब्बल ६२ विद्याशाखांमधील अनेक शब्दांचे, त्याच्या अर्थांचे आणि संदर्भांचे संकलन करून ते ऐतिहासिक क्रमाने नोंदविले आहे. आतापर्यंत १० लाखांहून अधिक शब्दांचे तसेच शब्दार्थांचे संपादन तब्बल ३५ खंडांमध्ये झाले असून ३६ वा खंड लवकरच प्रकाशित होणार असल्याची माहिती यानिमित्ताने देण्यात आली.