
देशविरोधी घोषणा राज्यात खपवून घेणार नाही : फडणवीस
पुणे, ता. २५ : “पाकिस्तान झिंदाबादची घोषणा महाराष्ट्रात खपवून घेतली जाणार नाही. अशा देशविरोधी घोषणा देणाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याबाबत पुण्याच्या पोलिस आयुक्तांशी बोलणे झाले आहे,’’ अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे दिली.
मराठी चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीजच्या (एमसीसीआयए) कार्यक्रमानंतर फडणवीस पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, “पुण्यात ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ने (पीएफआय) केलेल्या आंदोलनाचे दोन वेगवेगळे व्हिडिओ आले आहेत. त्याची योग्य तपासणी केली जाईल. पण, महाराष्ट्रात देशाविरोधात घोषणाबाजी करणाऱ्यांना सोडणार नाही. त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.”
ते म्हणाले, “गेल्या काही वर्षांपासून ‘पीएफआय’चा तपास सातत्याने सुरू आहे. त्या संदर्भात पुरावे गोळा करण्यात आले आहेत. त्यात वेगवेगळ्या राज्यांनीही काम केले आहे. मागच्या काळात गृहमंत्री असतानाही यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले होते. केरळ सरकारने ‘पीएफआय’वर बंदी घालावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे ‘पीएफआय’वर बंदी घालण्याच्या संदर्भात केंद्र सरकार योग्य ती कारवाई करेल.”
प्रकल्प गमावल्याचा पुरावा द्या
मेडिसीन डिव्हाईस पार्कचा राज्यात येणारा प्रकल्प गमवावा लागला असल्याची टीका माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली. त्याबद्दल फडणवीस म्हणाले, “हा प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता, याचा एक चिठ्ठीचा पुरावा दाखवू शकतात का?, आधीच्या सरकारमधील लोकं मनात येईल ते बोलत आहेत. ते अडीच वर्षे सरकारमध्ये होते. या काळात विकासाची कोणतीच कामे केली नाही. केंद्र सरकारला शिव्या देण्याचे एकमेव काम केले. आता वाटेल ते बोलले जाते. आम्ही हिमतीने महाराष्ट्रात गुंतवणूक आणत आहोत.”