
अवती भवती
‘एकत्र या, माणुसकीला जपा’ संदेश देण्यासाठी दौरा
पुणे, ता. २७ ः स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडियाच्या (एसआयओ) स्थापनेला ४० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संघटनेतर्फे ‘एकत्र या, माणुसकीला जपा’ हा संदेश देण्यासाठी देशव्यापी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे संघटनेचे राष्ट्रीय सचिव मुसब काझी आणि रमीस ई. के. यांनी मंगळवारी (ता.२७) पत्रकार परिषदेत दिली. मुस्लिम समाजात शिक्षणाविषयक जागरूकता निर्माण करणे, विविध धर्म, जात व भाषिक समूहांमध्ये एकोपा वाढविणे आणि इस्लाम धर्माविषयीचे गैरसमज दूर करण्याच्या उद्देशाने पुण्यासह विविध शहरांमधील सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते व शिक्षणतज्ज्ञांशी संवाद साधण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले. पुण्यात ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या निदर्शनात पाकिस्तानच्या समर्थनार्थ झालेल्या घोषणाबाजीची चौकशी करून, दोषींवर कारवाई करण्याची मागणी यावेळी संघटनेने केली.
कामगारांच्या गुणवंत मुलांचा सत्कार
पुणे, ता. २७ ः बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेच्या पुण्यातील केंद्रातर्फे कामगारांच्या गुणवंत मुलांचा सत्कार केला जाणार आहे. ९ वी, १०वी, आणि ११वी मध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत मुलांचा सत्कार महात्मा गांधी जयंतीनिमित्ताने रविवारी (ता.२) केला जाणार आहे. १०० मुलांना स्मार्ट वॉच व प्रशस्ती पत्र देण्यात येणार आहे. यावेळी कामगार सहआयुक्त अभय गीते, भगवान देवकर, प्रा.अंजली परांजपे आदी उपस्थित राहणार आहेत. हा समारंभ सायंकाळी ६ ते ८ यावेळेत फिरोदिया ऑडिटोरियम इंस्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स येथे होणार असल्याची माहिती हरप्रित सिंग आनंद, अजय गुजर, डी.एस शिरोळे यांनी दिली.
सल्लागार, वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
पुणे, ता. २७ ः रस्त्यांची चाळण झाल्याप्रकरणी महापालिकेने ठेकेदारांसोबत कार्यकारी अभियंता व सल्लागारांसह वरिष्ठांविरोधातही कारवाई करावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते नीलेश निकम यांनी मंगळवारी (ता.२७) पत्रकार परिषदेत केली. शहरातील रस्त्यांची चाळण झाल्याच्या तक्रारींची दखल घेत महापालिका आयुक्तांनी १३ ठेकेदारांना काळ्या यादीत टाकत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. मात्र, संबंधित सल्लागार कंपनी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई केली नाही, असा आरोप त्यांनी केला. रस्त्यांच्या कामाची तपासणी मुंबई व चेन्नईतील आयआयटी संस्थेकडून करण्याची मागणीही त्यांनी केली.