
सुरतच्या व्यावसायिकास पुण्यात पिस्तुलासह अटक
पुणे, ता. २५ : सुरतच्या एका व्यावसायिकाला पुणे लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने रेल्वे स्थानकावर विनापरवाना पिस्तुलासह अटक केली. त्याच्या ताब्यातून पिस्तुलासह सहा जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
अनिल कुमार उपाध्याय असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. उपाध्याय हा गुजरात येथील सुरतचा रहिवासी असून, तो कामानिमित्त पुण्यात आला होता. तो पुन्हा सुरत येथे परत जाताना पोलिसांनी त्याची झडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे एक पिस्तूल आणि सहा जिवंत काडतुसे आढळली. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, तपासात धक्कादायक बाबी समोर आल्या असून, याबाबत पोलिसांकडून गुप्तता राखली जात आहे. या संदर्भात लोहमार्ग पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.