
नानांनी झापले; दादांनी कुरवाळले पोटनिवडणुकीसंदर्भात कसब्यात भाजपची बैठक
पुणे, ता. २७ : कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीच्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत माजी खासदार संजय काकडे यांनी माजी नगरसेवकांना व इच्छुकांना चांगलेच फैलावर घेतले. या निवडणुकीत माझे सर्वांवर लक्ष असणार आहे. कोणाच्या प्रभागात किती लीड दिला यावर महापालिकेची उमेदवारी ठरणार आहे, ज्याने काम केले नाही व नेत्यांच्या पुढेमागे फिरणाऱ्या चमचांना उमेदवारी मिळूच देणार नाही, अशा शब्दांत त्यांनी दम भरला. त्यावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नाना हे आपल्या कुटुंबातील ‘कडक आई’ प्रमाणे वागत आहेत. आपण सर्वजण एकत्र येऊन ही निवडणूक जिंकायची आहे, असे सांगत एकजुटीचा संदेश दिला. दरम्यान, काकडे यांच्या वक्तव्याने खूष झालेल्या कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून याचे स्वागत केले.
या वेळी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, आमदार माधुरी मिसाळ, माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, माजी सभागृह नेते गणेश बिडकर, मंडल अध्यक्ष प्रमोद कोंढरे, सरचिटणीस राजेश येनपुरे, शैलेश टिळक, युवा मोर्चा शहराध्यक्ष राघवेंद्र मानकर, महिला मोर्चा शहराध्यक्षा अर्चना पाटील, कसबा महिला मोर्चा अध्यक्षा अश्विनी पांडे आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, ‘‘राज्यात ४० असे मतदारसंघ आहेत, जेथे काही झाले तरी भाजपचा उमेदवार निवडून येतो. त्यात कसब्याचा समावेश आहे. खासदार गिरीश बापट यांनी पक्षाची भक्कम बांधणी करून हा बालेकिल्ला तयार केला आहे. या निवडणुकीत मी किमान शंभर घरांना भेट देणार आहे. कार्यकर्त्यांनीही आपापल्या कामाचे नियोजन करावे. दरम्यान, आमच्या कार्यपद्धतीप्रमाणे संभाव्य उमेदवारांची नावे केंद्राकडे पाठवू. दिल्लीतून नावे घोषित होतील, असे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
संजय काकडे म्हणाले, ‘‘या मतदारसंघात केवळ एका प्रभागात २० हजाराचे मताधिक्य आहे. बाकी इतर ठिकाणी कमी मताने नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे तुम्ही निवडणुकीत व्यवस्थित काम करा. काही जण उमेदवारीसाठी चमचेगिरी करत आहेत, पण त्यातून तुम्हाला उमेदवारी मिळणार नाही. ही निवडणूक जिंकण्यासाठी सर्वांनी एकत्र या.’’
मुळीक म्हणाले, ‘‘गिरीश बापट यांनी भक्कम पक्ष बांधल्याने येथे पाच वेळा भाजपला विजय मिळाला. आजही ते पक्षाचे काम रुग्णालयातून करत आहेत. बापट यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी काम करावे.’’