
कर्करोगाचा संबंध थेट पोटातील जिवाणूंसोबत
पुणे, ता. ३० : आपल्या पोटातील असंख्य जिवाणू कर्करोगासाठी कारणीभूत ठरतात, तसेच ते कर्करोगावरील उपचारांच्या परिणामकारकतेशी याचा जवळचा संबंध असतो, असे पुरावे संशोधनातून मिळत आहेत. पोटातील आतड्यांत राहणारे काही जिवाणू मानवाचे मित्र असतात. ते कर्करोगाला रोखण्याचा प्रयत्न करतात. तर, काही जिवाणू मात्र कर्करोगाच्या निर्मितीस पोषक ठरतात, हे संशोधनातून अधोरेखित होत आहे.
माणसाच्या मोठ्या आतड्यांत वेगवेगळ्या वेळेत मिळून एक हजार प्रकारचे अब्जावधी जीव एकत्र रहात असतात. यात विषाणू, जिवाणूंपासून ते बुरशीपर्यंत अनेक जीव-जंतूंचा समावेश असतो. यापैकी काही जीव हे मानवी शरीरास उपयुक्त असतात तर, काही त्रासदायक ठरतात. त्यामुळे शरीरातील या जंतूविश्वाचा समतोल बिघडणे हे अनेक प्रकारच्या आजारांना आमंत्रण देणारे ठरते. यादृष्टीने हे नवीन संशोधन करण्यात आले आहे.
आतड्यातील जिवाणूविश्व व कर्करोग
कर्करोगाच्या निर्मितीस साहाय्य करण्यापासून ते कर्करोगावरील उपचारांच्या परिणामकारकतेशी या पोटातील जिवाणूविश्वाचा जवळचा संबंध असतो, असे दर्शविणारे असंख्य पुरावे आता मिळत आहे. आतड्यातील काही जिवाणू कर्करोगाला अनेक पातळ्यांवर रोखण्याचा प्रयत्न करतात. काही कर्करोगाच्या निर्मितीस प्रतिबंध घालतात. तर, काही जिवाणू हे त्यांच्या वाढीस आळा घालतात, अशी माहिती कर्करोगतज्ज्ञ डॉ. अनंतभूषण रानडे यांनी दिली.
काय परिणाम होतो?
१) काही जिवाणू आपल्या शरीरात दाह निर्माण करून कर्करोग निर्मितीला, त्याच्या वाढीला प्रोत्साहन देतात.
२) अशा जिवाणूंविरोधात प्रतिजैविकांचा वापर करून त्यांना आटोक्यात आणल्यास त्या प्रकारच्या कर्करोगालाही प्रतिबंध करता येतो.
३) कर्करोगावरील औषधेही काही वेळेस मित्र जिवाणूंच्या बरोबरीने काम करतात.
४) रुग्णाच्या शरीरात मित्र जिवाणूंची संख्या वाढल्यास केमोथेरपीच्या औषधांचा चांगला परिणाम झाल्याचे दिसते.
५) ‘इम्यूनोथेरपी’ची औषधेही मित्र जिवाणूंच्या उपस्थितीत चांगले काम करतात.
६) रुग्णाच्या शरीरातील मित्र जिवाणूंच्या विश्वाचे संतुलने असल्यास ती औषधे परिणामकारक ठरतात.
औषधांसाठी मार्गदर्शक
रुग्णावर उपचार करताना कोणती औषधे निवडावी, याचे मार्गदर्शनही जीवाणुंवरून करता येते. ‘बायोमार्कर’वरून कोणत्या प्रकारचे जिवाणू आहेत, याची अद्ययावत माहिती मिळते. मित्र जिवाणूंची उपस्थिती जास्त असल्यास उपचारांसाठी आशादायक चित्र निर्माण होते, असे डॉ. रानडे यांनी सांगितले.
आहाराचे महत्त्व
शरीरात तोंडापासून ते गुदद्वारापर्यंतच्या पोकळीत जिवाणू असतात. आपला आहार कसा आहे, कोणत्या घातक गोष्टींचा आपल्या आहारात समावेश असतो, यावर जिवाणूविश्वाचे समतोल अवलंबून असते. त्यामुळे फळे, पालेभाज्या, मुरवलेले पदार्थ, दही अशांचा आपल्या आहारात डॉक्टरांच्या सल्ल्याने समावेश करणे रुग्णांसाठी उपयुक्त ठरते, असे डॉ. रानडे यांनी अधोरेखित केले.
जगभरात आतड्यांतील जिवाणूविश्वावर सखोल शास्त्रीय अभ्यास सुरू आहे. त्या निष्कर्षांच्या आधारावर भविष्यात कर्करोग उपचारांची दिशा निश्चित होईल. हे संशोधन कर्करोगाच्या लढ्याच्या इतिहासातील एक महत्त्वाचे पान ठरेल.
- डॉ. अनंतभूषण रानडे,
कर्करोग तज्ज्ञ, अविनाश कॅन्सर क्लिनिक