शेंगदाण्याच्या भावात वाढ

शेंगदाण्याच्या भावात वाढ

पुणे, ता. १ : यंदाच्या हंगामात राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेशात भुईमुगाच्या लागवडीत घट झाली. त्यामुळे शेंगदाण्यांच्या भावात घाऊक आणि किरकोळ बाजारात वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात एक किलो शेंगदाण्याचा भाव प्रतवारीनुसार ११० ते १४० रुपयांपर्यंत पोचला आहे. एक-दीड महिन्यात घाऊक बाजारात शेंगदाण्याच्या भावात १० ते १२ रुपयांनी वाढ झाली.
मार्केट यार्डातील भुसार बाजारात राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेशातून दररोज १०० ते १५० गाड्या शेंगदाण्यांची आवक होते. राजस्थान, गुजरातमधील शेंगदाणा संकरित (हायब्रीड) आहे. किरकोळ बाजारात एक किलो शेंगदाण्याचे भाव १०० रुपयांच्या पुढे गेले असून दरातील तेजी दीर्घकाळ टिकून राहणार असल्याची व्यापारी अशोक लोढा यांनी दिली.

आवक सुरू होणार
भुसार बाजारात पुढील काही दिवसांत आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तमिळनाडू येथून शेंगदाण्यांची आवक सुरू होईल. मात्र, ही राज्ये दक्षिण भारतातच मोठया प्रमाणात शेंगदाणा पाठवितात. त्यामुळे महाराष्ट्रात अधिक प्रमाणात आवक होत नाही. शेंगदाण्याला तेल निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून मागणी असून शेंगदाणा तेलाचा वापर वाढलेला आहे. यामुळे भाव कमी होणार नसल्याचे अशोक लोढा यांनी सांगितले.

घर, हॉटेल आणि खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या विविध केंद्रांवर शेंगदाणा तेलाचा वापर वाढला आहे. ग्राहकांकडून शेंगदाण्याला कायमच मागणी असते. त्यामुळे शेंगदाण्यांचे भाव वाढले आहेत. दरवर्षी जून ते नोव्हेंबरपर्यंत शेंगदाण्यांना अधिक मागणी असते.
- गणेश चोरडिया, व्यापारी, मार्केट यार्ड

का झाली भाववाढ?
१) गुजरातमधून मोठ्या प्रमाणावर शेंगदाणा निर्यात
२) भुईमूग उत्पादक राज्यात हवामानातील बदल
३) जास्तकाळ रेंगाळलेला पाऊस
४) भुईमूग लागवड क्षेत्रात झालेली घट
५) सध्या हंगामाचा अखेरचा टप्पा सुरू
६) बाजारात शेंगदाण्याचा पुरवठा कमी


घाऊक आणि किरकोळ बाजारातील भाव
प्रकार - घाऊक -- किरकोळ
जाडा - १०० ते १०५ -- १२० ते १२५ रुपये
जी टेन - १०७ ते ११० -- ११५ ते १२० रुपये
घुंगरू - ११५ ते १२५ -- ११० ते १३० रुपये
स्पॅनिश - १०३ ते १३५ -- १३० ते १४० रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com