
अनैतिक संबंधातून मुलाचा खून करणाऱ्याला जन्मठेप
पुणे, ता. ४ : अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याच्या कारणातून दीड वर्षांच्या मुलाचा गळा दाबून खून करणाऱ्यास न्यायालयाने जन्मठेप आणि एक लाख २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी हा निकाल दिला.
धिराप्पा ऊर्फ चक्राप्पा शंकराप्पा हात्तरखिल्लळ (वय २४, रा. रांजणगाव, शिरूर, मूळ रा. कर्नाटक) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत मुलाचे वडील मल्लप्पा कुमाराच्या हात्तरखिल्लळ यांनी फिर्याद दिली होती. धिराप्पा याचे फिर्यादींच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. त्यातूनच त्याने ३१ मार्च २०१४ रोजी फिर्यादी यांचा दीड वर्षीय मुलगा गंगाधरचा शिरूरमध्ये खून केला होता. या प्रकरणात धिराप्पा विरोधात सुरुवातीला कर्नाटकमध्ये गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर हा गुन्हा शिरूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक एन. वाय. तडाखे यांनी केला. खटल्याचे कामकाज सरकारी वकील नामदेव तरळगट्टी यांनी पाहिले. सहायक पोलिस उपनिरीक्षक विद्याधर निचीत आणि हवालदार रेणुका भिसे यांनी पैरवी अंमलदार म्हणून काम पाहिले. दंडाच्या रकमेतील एक लाख रुपये फिर्यादी यांना द्यावे, असे आदेशात नमूद आहे.
आर्इ समोर मारले मुलाला...
घटनेच्या दिवशी धिराप्पा फिर्यादी यांच्या घरी आला. गंगाधरचा त्यांचा अनैतिक संबंधात अडथळा होत असल्याने त्याने चिडून मुलाचा गळा पकडला. त्याला रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या फिर्यादीच्या पत्नीला त्याने ढकलून दिले व पुन्हा मुलाचा गळा दाबला. त्यात मुलाचा मृत्यू झाला. त्यानंतर ही बाब कोणाला सांगितली, तर तुला जीवे मारेल, अशी धमकी त्याने फिर्यादीच्या पत्नीला दिली. त्यानंतर त्याने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मुलाला आणि महिलेला कर्नाटक येथे नेले. धिराप्पा फिर्यादीच्या गावी पोचल्यानंतर तेथून पळून गेला होता. त्यामुळे फिर्यादीच्या पत्नीने घडलेला सर्व प्रकार त्यांच्या आर्इला व पतीला सांगितला.