विद्यार्थी अन् आजी-आजोबांचं उलगडणार नातं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थी अन् आजी-आजोबांचं उलगडणार नातं
विद्यार्थी अन् आजी-आजोबांचं उलगडणार नातं

विद्यार्थी अन् आजी-आजोबांचं उलगडणार नातं

sakal_logo
By

पुणे, ता. ४ : मुलांचे आजी-आजोबांसोबत असणारं मैत्रीपूर्ण असं विलक्षण नातं आता शाळांच्या व्यासपीठावरही उलगडणार आहे. होय, येत्या वर्षात राज्यभरातील शाळा-शाळांमध्ये हे नातं उलगडणारा ‘आजी-आजोबा’ दिवस साजरा होणार आहे. शालेय शिक्षण विभागाने याबाबत निर्णय घेतला आहे.
सध्याची कौटुंबिक परिस्थिती पाहता आई-वडील नोकरी आणि व्यवसाय यानिमित्त घराबाहेर जास्त वेळ असतात. दरम्यान पाल्यांची संपूर्ण जबाबदारी आजी-आजोबांवर असते. शाळा सोडून घरातला जास्त वेळ मुलं ही आजी-आजोबांसोबत घालवतात. खरे पाहता आजी-आजोबा आणि नात किंवा नातू हे नातं विलक्षण असतं. आजी-आजोबा मुलांचे पहिले मित्र असतात. नात्याची तेव्हा तिथूनच खरी जडणघडण होत असते. आजी-आजोबांच्या नातवांशी असलेल्या घट्ट नात्याची ओळख होणे आजच्या काळात महत्त्वपूर्ण असून हे नातं पाल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गरजेचे आहे. म्हणूनच मुलांना शाळेबरोबरच आजी-आजोबांच्या महत्त्वपूर्ण नात्याची नव्याने ओळख व्हावी, यासाठी राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘आजी-आजोबा दिवस’ साजरा होणार आहे. प्रत्येक वर्षी सष्टेंबर महिन्याच्या पहिल्या सोमवारनंतर येणाऱ्या रविवारी हा दिवस साजरा केला जाणार आहे. त्याअनुषंगाने या वर्षी १० सप्टेंबर २०२३ ला हा दिवस साजरा केला जाणार आहे. या प्रस्तावित दिवशी कार्यक्रमाचे आयोजन शाळेकडून न करता आल्यास शाळेने आपल्या सोयीप्रमाणे वर्षातून एक दिवस ‘आजी-आजोबा’ दिवस म्हणून साजरा करावा, अशी सूचना शिक्षण व क्रीडा विभागाचे सहसचिव झ. मु. काझी यांनी अध्यादेशाद्वारे दिली आहे.
यानिमित्ताने राज्यस्तर, जिल्हास्तर व शाळा स्तरावर विविध कार्यक्रम साजरे करण्यात यावेत, असेही शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. शाळेतील अनुभवासह आजी-आजोबांच्या अनुभवातून मिळणारी माहिती या गोष्टी पाल्यांच्या जडणघडणीसाठी पोषक ठरतात. त्यामुळे शाळांमध्ये विविध उपक्रमांच्या माध्यमातून आजी-आजोबांना शाळेत आमंत्रित करून मुलांशी संवाद, खेळ व गप्पा गोष्टी, तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून ओळख करणे, यासाठी हा आजी-आजोबा दिवस साजरा केला जाणार आहे.

शाळांनी हे उपक्रम राबवावेत
- परिचय करून द्यावा
- मनोरंजनासाठी संगीत, गायन, वादन, चित्रकला, नृत्य कार्यक्रम
- संगीत खुर्ची यासारखे खेळ
- पारंपरिक वेशभूषेत आजी-आजोबांना बोलावणे
- आजीच्या बटव्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगणे
- विद्यार्थ्यांनी कलाकृती सादर कराव्यात
- शाळेतील शिक्षकांनीसुद्धा सहभाग घ्यावा