
हेमंत रासने, अश्विनी जगताप यांना भाजपकडून उमेदवारी
पुणे, ता. ४ : कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने अखेर आज सकाळी उमेदवारांची यादी जाहीर केली. कसब्यासाठी पुणे महापालिका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांना, तर चिंचवडसाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना संधी देण्यात आली आहे.
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी देणार की भाजप कार्यकर्त्यास संधी देणार यावरून गेले काही दिवस चर्चा सुरू होती. अखेर भाजपने रासने यांना उमेदवारी देऊन त्याला पूर्णविराम दिला. टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली आहे. यात मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक, मुलगा कुणाल यांच्यासह हेमंत रासने, माजी सभागृहनेते गणेश बिडकर, धीरज घाटे हे इच्छुक होते. या पाच उमेदवारांची नावे प्रदेश भाजपने केंद्रीय निवडणूक समितीकडे पाठवली होती. यात रासने यांच्या नावाला अधिक पसंती देण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी (ता. ३) रात्री केसरीवाड्यात जाऊन टिळक यांची भेट घेतली. त्या वेळी उमेदवारीचा निर्णय दिल्लीतून होणार आहे, पण टिळक कुटुंबाला भाजपमध्ये सन्मानाचे पद दिले जाईल, असे सांगून समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
चिंचवड विधानसभेसाठी अश्विनी जगताप यांना संधी देण्यात आली. भाजपकडून उमेदवारीसाठी अश्विनी व बंधू शंकर जगताप यांच्या नावाची चर्चा होती. दोघांनीही उमेदवारी मागितल्याने पक्षनेतृत्वासमोर पेच निर्माण झाला होता. त्यामुळे दोघांपैकी नेमकी पक्षाची अधिकृत उमेदवारी कोणाला मिळेल, याकडे शहरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. अखेर भाजप नेतृत्वाने जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर केली. त्या सोमवारी दुपारी एक वाजता उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
दरम्यान, कसबा पोटनिवडणुकीसाठी शनिवारी २९ इच्छुकांनी ४९ उमेदवारी अर्ज नेले आहेत, तर चिंचवड पोटनिवडणुकीसाठी १८ जणांनी एकूण २९ उमेदवारी अर्ज नेले. मात्र एकही अर्ज दाखल झाला नसल्याचे या मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले.
रासने यांची राजकीय व सामाजिक पार्श्वभूमी
- २००२, २००१२, २०१७ तीन वेळा नगरसेवक
- २०१९ पासून सलग चार वेळा स्थायी समिती अध्यक्ष
- श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे सरचिणीस
- सुवर्णयुग सहकारी बँकेचे अध्यक्ष
PNE23T22768- रासने
22774 - अश्विनी जगताप