
ब्रह्मोद्योग २०२३ परिषदेचे आयोजन
पुणे, ता. ६ ः अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे चार दिवसीय ‘ब्रह्मोद्योग २०२३’या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. दिल्ली येथे होणारी ही राष्ट्रीय परिषद उद्योजक, डॉक्टर व विधिज्ञ यांच्यासाठी होत आहे, अशी माहिती अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे पेठ विभाग कार्याध्यक्ष सचिन टापरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या प्रसंगी राष्ट्रीय सरचिटणीस लक्ष्मीकांत धडफळे, संजीव कुलकर्णी, केतकी कुलकर्णी आदी उपस्थित होते. यावेळी धडफळे म्हणाले, ‘‘संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गोविंदजी कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून साकारलेले ‘ब्रह्मोद्योग २०२३’ हे ब्राह्मण समाजातील विविध व्यावसायिक घटकांना एकत्र आणणारे राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठ आहे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ करीत असलेले कार्य देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचावे हा या परिषदेचा मुख्य उद्देश होता. ही परिषद २५ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत दिल्लीमध्ये पार पडेल. त्याचबरोबर २७ फेब्रुवारी रोजी संस्थेच्या विविध राज्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक तालकटोरा स्टेडिअम (दिल्ली) येथे आयोजित करण्यात आली आहे.