
पोलिसांनाच धमकावून लुटण्याचा प्रयत्न
पुणे, ता. ६ : चोरट्यांना पकडण्यासाठी लावलेल्या सापळ्यातील पोलिसांनाच धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला. बोपदेव घाटात हा प्रकार घडला. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी चार चोरट्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीचे आठ गुन्हे उघडकीस आले आहेत.
यश रमेश ढेबे (वय १९), विशाल रामनिवास गौतम (वय १९), वसीम अब्दुल अजीज शाह (वय २५) आणि दीपक रमेश सुतार (वय २५, सर्व रा. कात्रज) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून पाच दुचाकी, मोबाईल आणि चाकू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोपदेव घाटात फिरायला येणाऱ्या नागरिकांना धमकावून लूटमार करण्याच्या घटना नेहमी घडतात. त्यामुळे काही महिन्यांपूर्वीच पोलिसांनी बोपदेव घाटात पोलिस चौकी सुरू केली होती. चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी चोरट्यांचा माग काढण्यास सुरवात केली होती. त्यानुसार तपास पथकातील साध्या वेशातील पोलिसांनी सापळा रचला. बोपदेव घाटात सामान्य नागरिकांप्रमाणे साध्या वेशातील दोन पोलिस कर्मचारी गप्पा मारत थांबले होते. त्या वेळी आरोपी ढेबे, गौतम, शाह, सुतार आणि त्यांच्या बरोबर असलेल्या एका साथीदाराने साध्या वेशातील पोलिसांना चाकूचा धाक दाखविला. पोलिस कर्मचाऱ्यांकडील मोबाईल हिसकाविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने आरोपींना त्वरित पकडले. त्यांच्या बरोबर असलेला एक साथीदार पसार झाला.