
स्वामी समर्थांच्या पालखीचे स्वागत
पुणे : श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चा जयघोष...रांगोळीच्या पायघड्या...फुलांनी सजविलेल्या पालखीमध्ये ठेवलेल्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची सुरु असलेली लगबग आणि ठिकठिकाणी झालेले स्वागत अशा भक्तीने भारलेल्या वातावरणात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट येथून आलेल्या श्री स्वामी समर्थांच्या पालखीचे स्वागत पुणेकरांनी उत्साहात केले. महात्मा फुले मंडईतील श्री शारदा गजानन मंदिरापासून निघालेला पालखी सोहळा काँग्रेस भवन येथे विसावला. व्यंकटेश बिल्डकॉनचे अंकुश आसबे आणि पिनॅकल ग्रुपचे गजेंद्र पवार यांच्या हस्ते पालखी पादुका पूजन आणि आरती होऊन मिरवणुकीस प्रारंभ झाला. यावेळी पुणे मराठी बांधकाम संघटनेचे नंदू घाटे, सचिव मिलिंद देशपांडे, संदीप चव्हाण, श्रीपाद थोरात, अण्णा थोरात, विनायक घाटे, विजय काजळे, नामदेवराव मोहिते, राजाभाऊ वरखडे, विलास चव्हाण आदी उपस्थित होते.
महालक्ष्मी पाटोत्सवानिमित्त रथयात्रा
पुणे : सोमवार पेठेतील महालक्ष्मी मंदिराच्या वतीने तीन दिवसीय महालक्ष्मी पाटोत्सव नुकताच पार पडला. कार्यक्रमादरम्यान झालेली रथयात्रा भाविकांचे प्रमुख आकर्षण ठरली. रथयात्रेमध्ये चित्ररथ, ध्वज पथक, ढोल ताशा पथकांचा देखील समावेश होता. या रथयात्रा प्रसंगी ट्रस्टी सरपंच डॉ. गुरुदत्त शर्मा, डॉ. अरुण जोशी, शरद नर्तेकर, भवरजी महाराज, महेश दवे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरस्वती प्रशालेतील वर्गमित्रांचा स्नेहमेळावा
पुणे : मैत्रीचं नातं जपत नातू बागेतील सरस्वती मंदिर प्रशालेतील १९६५ मधील वर्गमित्रांचा स्नेहमेळावा नुकताच उत्साहात झाला. गेल्या पाच वर्षांपासून हे मित्र भेटतं होते, पण मध्यंतरी कोरोना काळात भेटणे-बोलणे बंद झाले, तरी सोशल मीडियावर सगळे संपर्कात होते. या मेळाव्यात जुन्या आठवणींना उजाळा देत, शालेय जीवनात घडलेल्या गंमती जमती ऐकून सर्वजण भूतकाळात हरवून गेले. यामध्ये चंद्रकांत पोटे, प्रकाश भावे, सुहास टिल्लू, वैशाली राजे, आर्य भिडे, डॉ. ज्योत्स्ना गुळवे, डॉ. सुरेश कठाणे, मुकुंद खाडीलकर, गिरीश कवीश्वर, उमाकांत फुकणे, गोविंद महाजन, संपत शितोळे आदी उपस्थित होते.
शिबिरात ७६ जणांचे रक्तदान
पुणे : मातोश्री गीताबाई डांगी यांच्या स्मृतिदिनानिमित्त झालेल्या शिबिरात ७६ जणांनी रक्तदान केले. संकल्पदिप संस्था व आर. जी. फिटनेस (गीताई जिम) यांच्यातर्फे हे शिबिर झाले. सामाजिक बांधिलकीतून २०१३ पासून या शिबिराचे आयोजन होत आहे. या कार्यक्रमास धनकवडीतील आधार ब्लड बँकेने सहकार्य केले. या शिबिरास रवी डांगी, संकल्पदिपचे अध्यक्ष जितेंद्र खवले, सहसचिव अविनाश आल्हट, स्वप्नील खवले आदी उपस्थित होते.