
Pune Crime News : महिलांचे दागिने हिसकावल्याच्या तीन घटना
पुणे : कोथरूड, डेक्कन जिमखाना आणि बिबवेवाडी परिसरात महिलांचे दागिने हिसकावण्याच्या तीन घटना नुकत्याच घडल्या. यामध्ये दोन लाख ७० हजार रुपयांचे दागिणे चोरीला गेले.
कोथरूडमधील भुजबळ टाऊनशिप परिसरात महिलेच्या गळ्यातील एक लाख ९० हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना रविवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. तक्रारदार महिला भुजबळ टाऊनशिप परिसरात दुपारी मुलीची वाट पाहत थांबली होती.
त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांचे मंगळसूत्र हिसकावले. याबाबत संबंधित महिलेने कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिस उपनिरीक्षक बसवराज माळी तपास करत आहेत.
डेक्कन जिमखाना भागातील स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात दुचाकीवरील सहप्रवासी महिलेची ३० हजार रुपयांची सोनसाखळी चोरट्यांनी हिसकावून नेली. रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास हा प्रकार घडला.
याबाबत एका महिलेने डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तक्रारदार महिला आणि पती दुचाकीवरून कर्वे रस्त्याकडे निघाले होते. त्या वेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली. पोलिस उपनिरीक्षक कल्याणी पाडोळे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.
बिबवेवाडीतील पासलकर चौकात दुचाकीवरील सहप्रवासी महिलेचे ५५ हजारांचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून नेले. तक्रारदार महिला आणि पती दुचाकीवरून पासलकर चौकातून निघाले होते. त्या वेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले.