
भारतीय नौदलात अधिकारी पदासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
पुणे, ता. ६ ः भारतीय नौदलाच्या वतीने शैक्षणिक, कार्यकारी (एक्झिक्युटिव्ह) आणि तांत्रिक विभागात अधिकारी पदासाठी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. बी. टेक कॅडेट प्रवेश योजना अंतर्गत होणारी ही प्रक्रिया बारावी पूर्ण केलेल्या पुरुष उमेदवारांसाठी आहे.
ही प्रवेश प्रक्रिया चार वर्षांच्या बी. टेक पदवी अभ्यासक्रमासाठी असून यामध्ये एकूण ३५ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये पाच जागा या शैक्षणिक शाखेसाठी तर उर्वरित ३० जागा या कार्यकारी आणि तांत्रिक विभागासाठी राखीव आहेत. यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी लेखी परीक्षा नसून थेट सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या मुलाखतीद्वारे (एसएसबी) उमेदवारांची निवड केली जाणार आहे. यासाठी बारावीनंतर बी.ई, बी. टेकसाठी जेईई मेन २०२२ च्या परीक्षा दिलेल्या उमेदवारांनाच अर्ज करता येणार आहे. तसेच उमेदवारांना एसएसबीसाठी जेईईच्या गुणवत्तेच्या आधारावर बोलविण्यात येणार आहे. यातून निवडलेल्या उमेदवारांना केरळच्या एझिमाला येथील नौदल ॲकॅडमीत प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर या उमेदवारांना नौदलात अधिकारी म्हणून रुजू केले जाईल.
येथे करा अर्ज ः
प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहिती किंवा अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी भारतीय नौदलाच्या www.joinindiannavy.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. उमेदवारांना येत्या १२ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे.
अर्ज करण्यासाठी पात्रता ः
वयोमर्यादा: उमेदवारांचा जन्म जानेवारी २००४ ते जुलै २००६ दरम्यान झालेला असावा.
शैक्षणिक पात्रता: उमेदवारांनी बारावीची परीक्षा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयात ७० टक्के गुणांसह आणि दहावी किंवा बारावीत इंग्रजीमध्ये ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी.