अतिक्रमण कारवाईत आरोग्य मंत्र्यांची उडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अतिक्रमण कारवाईत आरोग्य मंत्र्यांची उडी
अतिक्रमण कारवाईत आरोग्य मंत्र्यांची उडी

अतिक्रमण कारवाईत आरोग्य मंत्र्यांची उडी

sakal_logo
By

धनकवडी, ता. ६ : रस्त्यावर बेकायदा भाजी विक्रीची गाडी लावून व्यवसाय करणाऱ्यावर महापालिकेच्या धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाने कारवाई करून १० हजाराचा दंड ठोठावला. हा प्रकार आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या कानावर येताच त्यांनी थेट क्षेत्रीय कार्यालय गाठून कारवाई करू नये, अशी मागणी केली. पण महापालिकेचे अधिकारी कारवाईवर ठाम राहिल्याने दंडाची रक्कम भरावी लागली. मात्र, त्यामुळे संतापलेल्या आरोग्यमंत्र्यांनी थेट महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. याप्रकारामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.
धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागातर्फे अतिक्रमणांवर कारवाई केली जात आहे. सोमवारी दुपारी एका भाजी विक्रेत्यावर कारवाई करून त्यास १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. एवढी मोठी रक्कम भरणे शक्य नसल्याने त्याने दंड कमी करावा म्हणून विनंती केली पण त्यास दाद दिली नाही.
या भाजी विक्रेत्याने प्रहार जनशक्ती पक्षाच्या संतोष साठे यांना फोन करून घडलेला प्रकार कानावर घातला. त्यांनीही तेथे येऊन अधिकारी, कर्मचाऱ्यांना समजून सांगितले. पण ते ऐकण्यास तयार नव्हते. साठे यांनी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांना फोन करून हा प्रकार कानावर घातला. त्यावेळी कडू यांनीही अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलून गाडी सोडून देण्यास सांगितले. तरीही अधिकाऱ्यांनी ऐकले नाही.

आयुक्तांकडे आज बैठक
संतोष साठे यांनी थेट आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांना फोन करून हा प्रकार सांगितला. त्यांनीही संबंधित अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा देखील केली. पण अधिकारी ऐकत नसल्याने पुढच्या पाच मिनिटांत सावंत हे धनकवडी क्षेत्रीय कार्यालयात पोचले. अधिकाऱ्यांशी चर्चा करून एवढा दंड घेणे बरोबर नाही असे सुनावले तरीही अधिकारी ऐकत नसल्याने त्यांनी थेट आयुक्तांना फोन करून हा प्रकार कानावर घालून याची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार मंगळवारी आयुक्तांकडे यासंदर्भात बैठक होणार आहे.

आरोग्य मंत्र्यांनी अतिक्रमण कारवाईसंदर्भात तक्रार केली आहे. यासंदर्भात मंगळवारी बैठक होणार आहे. याची चौकशी करून पुढील कार्यवाही केली जाईल.
- विक्रम कुमार, आयुक्त, पुणे महापालिका