कसबा, चिंचवड निवडणुकीत महाविकास आघाडीत बंडखोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कसबा, चिंचवड निवडणुकीत
महाविकास आघाडीत बंडखोरी
कसबा, चिंचवड निवडणुकीत महाविकास आघाडीत बंडखोरी

कसबा, चिंचवड निवडणुकीत महाविकास आघाडीत बंडखोरी

sakal_logo
By

पुणे, ता. ७ ः कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीमध्ये रंगत वाढली आहे. कसब्यातून काँग्रेसचे बाळासाहेब दाभेकर यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरला आहे. तर चिंचवडमध्ये महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसने नाना काटे यांना उमेदवारी जाहीर केल्याने येथील प्रमुख दावेदार असलेले इच्छुक राहुल कलाटे यांनी अपक्ष अर्ज भरला. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात महाविकास आघाडीपुढे बंडखोरांना थोपविण्याचे आव्हान आहे.
कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपतर्फे हेमंत रासने आणि काँग्रेसतर्फे रवींद्र धंगेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काँग्रेसचे इच्छुक दाभेकर यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यावर अन्याय केला आहे असे सांगत मंगळवारी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला आहे. १० फेब्रुवारी रोजी अर्ज मागे घेता येणार आहे, तोपर्यंत काँग्रेसच्या नेत्यांना दाभेकर यांची समजूत काढण्याचे आव्हान आहे.
चिंचवड मतदारसंघात भाजपतर्फे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांची पत्नी अश्‍विनी जगताप यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज भरला. महाविकास आघाडीमध्ये ही जागा राष्ट्रवादीकडे गेल्याने तेथे उमेदवार कोण असावा हे निश्‍चित करणे राष्ट्रवादीच्या नेत्यांना अवघड झाले होते. दरम्यान २०१९ मध्ये शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून भाजपला जोरदार टक्कर दिली होती. पोटनिवडणुकीत त्यांनी शिवसेना व राष्ट्रवादी दोन्हीकडूनही उमेदवारी मिळविण्यासाठी फिल्डिंग लावली होती. या दोन्ही पक्षाचे नेते देखील त्यासाठी तयार होते. पण राष्ट्रवादीचे महापालिकेतील माजी विरोधीपक्षनेते नाना काटे यांनी त्यांचे राजकीय वजन वापरून उमेदवारी मिळवली. त्यामुळे कलाटे यांनी अपक्ष अर्ज भरून बंडखोरी केली. त्यामुळे आता या मतदारसंघात तिरंगी निवडणूक होण्याची शक्यता आहे.