
भक्ती रंगातून गणरायाचे वर्णन
पुणे, ता. १० : ‘गजानना श्री गणराया आधी वंदू तुज मोरया’, ‘रांजण गावाला गावाला महागणपती’, ‘उडवू नको रंग थांब कृष्णा’, ‘भेटी लागी जिवा अशा एकाहून एक अप्रतिम भाव आणि भक्ती गीतांच्या सादरीकरणाने ‘भक्ती रंग’ हा कार्यक्रम रंगला. गणरायाच्या विविध लीलांचे वर्णन आणि विनायकाच्या स्थानांची महती गीतांद्वारे रसिकांसमोर उलगडण्यात आली.
मानाचा चौथा श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे ‘भक्ती रंग’ या कार्यक्रमाचे बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मानाचा पहिला कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, तुळशीबाग मंडळाचे विनायक कदम, नितीन पंडित आदी यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमामध्ये गायक राजेश दातार, राधा मंगेशकर, प्रज्ञा देशपांडे या गायकांनी भक्तिपूर्ण गीते सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. विनीत तिकोनकर (तबला), पद्माकर गुजर (टाळ), केदार परांजपे (कीबोर्ड), प्रसन्न बाम (हार्मोनिअम) यांनी साथ संगत केली. निवेदक मिलिंद कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे निरूपण केले.
गजानना श्री गणराया...या गीताने श्री गणरायाचे मंगलमय स्मरण करून कार्यक्रमाची बहारदार सुरवात करण्यात आली. त्यानंतर पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या ‘त्या फुलांच्या गंधकोशी’ हे गीत राजेश दातार यांनी सादर केले. पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेले ‘माझे माहेर पंढरी’ या गीतातून राजेश दातार यांनी रसिकांची वाहवा मिळवली. राधा मंगेशकर यांनी ‘रांजणगावाला गावाला महागणपती नांदला’ या अप्रतिम गीताचा सादरीकरणातून रांजणगावातील महागणपतीचे अप्रतिम वर्णन केले. संत तुकाराम महाराज यांची रचना असलेले ‘भेटी लागी जिवा लागलीसे आस’ हे गीत प्रज्ञा देशपांडे यांनी सादर केले.