कसब्यात १६ तर चिंचवडमध्ये २८ उमेदवार उभे

कसब्यात १६ तर चिंचवडमध्ये २८ उमेदवार उभे

पुणे, ता. १० : कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी शुक्रवारी (ता. १०) अखेरच्या दिवशी पाच उमेदवारांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत. त्यामुळे भाजप-कॉंग्रेससह आता १६ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे कसब्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी सरळ लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. चिंचवडच्या पोटनिवडणुकीमध्येही पाच जणांनी उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने आता रिंगणात २८ उमेदवार राहिले आहेत. चिंचवडमध्ये भाजप-राष्ट्रवादी-अपक्ष यासह उमेदवारांमध्ये लढत होणार आहे.

या निवडणुकीसाठी २१ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यानंतर गुरुवार (दि.९) पासून उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सुरुवात झाली. पहिल्या दिवशी कॉंग्रेसचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब दाभेकर यांनी अर्ज माघारी घेतला. तर शुक्रवारी (ता.१०) चार उमेदवारांनी अर्ज मागे घेतला. यामध्ये प्रामुख्याने आप आदमी पक्षाचे उमेदवार किरण कद्रे यांनी सुद्धा अर्ज मागे घेतला. त्यामुळे कसबा निवडणुकीसाठी १६ उमेदवार रिंगणात आहे. भाजप उमेदवार हेमंत रासने आणि कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यामध्ये लढत होणार आहे. अर्ज माघारीनंतर उमेदवार निश्‍चित झाल्याने लगेचच अपक्ष उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले. दरम्यान, या निवडणुकीसाठी २६ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून मतमोजणी दोन मार्च रोजी होणार आहे.
उमेदवारी अर्ज माघारीची मुदत शुक्रवारी संपुष्टात आल्याने कसब्यातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. कॉंग्रेसला बंडखोरी रोखण्यात यश आल्याने महाविकास आघाडी विरुद्ध महायुती यांच्यात सरळ लढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
.............
चिंचवड पोटनिवडणुकीत २८ उमेदवार
दरम्यान, थेरगाव येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये पाच जणांनी उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने चिंचवड पोटनिवडणुकीत आता रिंगणात २८ उमेदवार राहिले आहेत.
भाजपच्या उमेदवार अश्‍विनी जगताप, महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार विठ्ठल ऊर्फ नाना काटे, अपक्ष राहुल कलाटे या प्रमुख उमेदवारांमध्ये लढत रंगणार आहे. उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा शुक्रवार शेवटचा दिवस होता. दुपारी तीनपर्यंत पाच जणांनी अर्ज मागे घेतले. त्यामध्ये राजेंद्र काटे, भाऊसाहेब अडागळे, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण कदम, ॲड. मनिषा कारंडे, रवींद्र पारधे यांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com