पुण्यातून आणखी दोन मार्गावर ‘वंदे भारत’

पुण्यातून आणखी दोन मार्गावर ‘वंदे भारत’

पुणे, ता. ११ ः पुणेकरांना लवकरच आणखी दोन वंदे भारत एक्स्प्रेसने प्रवास करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. पुणे ते सिकंदराबाद आणि पुणे ते अहमदाबाद या दोन मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होत आहे. पुणे विभागाकडून तशा हालचालीदेखील सुरू झाल्या आहे. येत्या मार्च किंवा एप्रिल महिन्यात पुणे ते सिकंदराबाद दरम्यान धावणाऱ्या शताब्दी एक्स्प्रेसचे रेक बदलून त्या जागी वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होत आहे. याची अद्याप तारीख ठरली नसली तरी सिकंदराबाद विभाग मार्च महिन्यांत ही रेल्वे सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहे. यासह पुणे विभागाकडूनदेखील अहमदाबादसाठी वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

मुंबई -सोलापूर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला पहिल्या दिवशी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभला. सोलापूर स्थानकावरून या रेल्वेमध्ये सुमारे ६०८ प्रवासी चढले. पुण्याहूनदेखील या रेल्वेतून प्रवास करणाऱ्याची संख्या अधिक होती. यंदाच्या अर्थसंकल्पात वंदे भारत एक्स्प्रेसकरिता स्वतंत्र पिट लाईन बनविण्यासाठी ५० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. येत्या काही दिवसांत घोरपडी डेपोत ‘वंदे भारत’साठी स्वतंत्र व कव्हर्ड पीटलाईन तयार केली जाणार आहे.

प्रवाशांची डायनॅमिक फेअरपासून सुटका
शताब्दी एक्सप्रेसला डायनॅमिक फेअर आहे. रेकमध्ये बदल होत असल्याने फेअरमध्ये देखील बदल होणार आहे. सध्या असलेल्या डायनॅमिक फेअरपासून प्रवाशांची सुटका होईल. मात्र वंदे भारतचा दर देखील लागू होईल. हा तिकीट दर आताच्या दरापेक्षा निश्चितच जास्त असेल.

पुण्याहून मुंबईला जाणारे प्रवासी अधिक
वंदे भारत एक्स्प्रेसने शनिवारी पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक होती. पुण्याहून मुंबईला जाणारी प्रवासी संख्या ही ७५७ इतकी होती. तर मुंबईहून पुण्याला येणारी प्रवासी संख्या ६७८ इतकी होती. यातदेखील चेअरकार मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त होती. दोन्ही मिळून चेअरकार प्रवाशांची संख्या १२५८ तर एक्सिक्युटीव्ह डब्यातील प्रवासी संख्या १७७ होती.

वंदे भारत ही संपूर्णपणे भारतीय बनावटीची रेल्वे आहे. येत्या काळात ती अधिकाधिक मार्गावर धावेल. पुण्याहून सिकंदराबाद व अहमदाबाद या दोन शहरांकरिता ती सुरू होण्याची दाट शक्यता आहे. येत्या काही दिवसांत याबाबतचे चित्र स्पष्ट होईल.
- जोएल मॅकेन्झी, वरिष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता, पुणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com