सळसळत्या ऊर्जेसह फिरोदिया करंडकाला सुरूवात
पुणे, ता. ११ ः विद्यार्थ्यांचे कल्पक अन् नावीन्यपूर्ण कलाविष्कार, सरस प्रयोग सादर करण्याची जिद्द आणि सळसळत्या ऊर्जेसह फिरोदिया करंडक आंतरमहाविद्यालयीन विविध गुणदर्शन स्पर्धेला शनिवारी सुरूवात झाली. पहिल्याच दिवशी सादर झालेल्या प्रयोगांनी यंदाची स्पर्धा रंगतदार होणार असल्याची चुणूक दाखवली.
स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे उद्घाटन सर्व परीक्षकांच्या उपस्थितीत करण्यात आले. यंदा प्राजक्ता राज, देवेंद्र गायकवाड, आदित्य इंगळे आणि गिरीश दातार हे परीक्षक म्हणून काम पाहत आहेत. सर्व परीक्षकांचे स्वागत सूर्यकांत कुलकर्णी यांनी केले. त्यानंतर गतवर्षीच्या स्पर्धेचे विजेते असणाऱ्या ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संघाने सादरीकरण केले. त्यानंतर डॉ. डी. वाय. पाटील आर्किटेक्चर महाविद्यालय, आकुर्डी आणि पद्मभूषण वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या महाविद्यालयांच्या संघांनी सादरीकरण केले. सायंकाळच्या सत्रात पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय, झील अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय आणि बृहन् महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या संघांचे सादरीकरण झाले.
सामाजिक-आर्थिक विकास संस्था, स्वप्नभूमी निर्मित आणि एचसीएल फाउंडेशन यांच्या सहकार्याने होणारी ही स्पर्धा सातारा रस्त्यावरील अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात पार पडत आहे. ११ ते १५ फेब्रुवारी दरम्यान दुपारी १.३० वाजता आणि सायंकाळी ६ वाजता, अशा दोन सत्रांमध्ये प्राथमिक फेरी रंगणार आहे. यातून निवडलेल्या संघांमध्ये २५ व २६ फेब्रुवारीला अंतिम फेरी पार पडेल.