मुलांच्या प्रवेशासाठी पालकांची धावाधाव ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुलांच्या प्रवेशासाठी पालकांची धावाधाव !
मुलांच्या प्रवेशासाठी पालकांची धावाधाव !

मुलांच्या प्रवेशासाठी पालकांची धावाधाव !

sakal_logo
By

पुणे, ता. १३ : आयटी क्षेत्रात काम करणारी स्नेहा पवार (नाव बदललेले आहे) हिने आपली मुलगी आराध्या (वय ४ वर्षे) हिला शाळेत टाकण्यापूर्वी चक्क दोन दिवस सुटी घेतली अन्‌ आसपासच्या शाळांमध्ये जाऊन चौकशी सुरू केली. अखेर तिला हवी तशी शाळा मिळाली अन्‌ तिच्या शाळाशोध मोहिमेला विश्रांती मिळाली, तर स्वप्नील आणि अश्विनी खांडके हे दोघे गेल्या आठवडाभरापासून सकाळी कामाला जाण्यापूर्वी घराजवळील चांगल्या शाळांमध्ये जाऊन प्रवेशाची विचारपूस करत असून प्रत्येक शाळेत त्यांचा मुलगा राघव (वय साडेतीन वर्षे) याचे नाव प्रवेशाच्या नोंदवहीत लिहून घेतले जात आहे. मात्र अद्याप मनासारखी शाळा मिळाली नसल्याचा अनुभव या दोघांनी सांगितला.
खरेतर जानेवारी-फेब्रुवारीच नव्हे, तर अगदी त्याअगोदर म्हणजेच नोव्हेंबर-डिसेंबर (मागील वर्षातील) पासूनच मुलांच्या शाळा प्रवेशासाठी पालकांची शाळा शोधमोहीम सुरू होते. परंतु शाळा शोधण्यापूर्वी कित्येक महिने आधीपासूनच त्यादृष्टीने तयारी केली जाते. सुरवातीला मुलांसाठी एसएससी, सीबीएसई, आयसीएसई, आयबी, केंब्रिज अशा कोणत्या बोर्डाची शाळा निवडायची, तिचे माध्यम काय असावे, हे घरोघरी ठरविले जाते. यावर एकमत झाल्यावर ठरल्याप्रमाणे शाळा शोधण्याची मोहीम सुरू होते.

सुविधांबाबत खोलात चौकशी
अर्थात आजकाल जवळपास ७० ते ८० टक्के शाळांचे अर्ज हे ऑनलाइन आहेत. परंतु ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी पालक स्वत: शाळांना भेटी देऊन सुविधांबाबत विचारणा करत आहेत. पालक शाळांमधील सुविधा, शाळा मान्यतेचे प्रमाणपत्र, नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे होणारे बदल याबाबत खोलात जाऊन विचारणा करत असल्याचा अनुभव शाळा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

शाळा शुल्कामुळे पालक चिंतातूर!
शाळा निश्चितीनंतरचा टप्पा म्हणजे शुल्क देणे. परंतु सध्या बहुतेक शाळांचे नर्सरी, ज्युनिअर केजी अशा प्रवेशाचे शुल्क हे ५० हजार ते ९५ हजार रुपयांच्या घरात आहे. त्यामुळे शाळांचे शुल्क देताना पालकांना खिसा रिता करावा लागत आहे. संपूर्ण शैक्षणिक वर्षात हप्त्याने शुल्क भरण्याकडे पालकांचा सर्वाधिक कल असल्याचे दिसून येते, तर शुल्क परवडत नसल्याने अनेक पालक आपल्या पाल्यांसाठी अनुदानित शाळांना पसंती देत आहेत. काही पालकांनी मुलांना चांगले शिक्षण मिळावे, म्हणून आधीपासूनच मुलांच्या शैक्षणिक खर्चाचे योग्य नियोजन केल्याचे दिसून येते.

पालकांमध्ये प्रवेशासाठी उत्साह असून त्यांच्यामध्ये सध्याच्या शिक्षण पद्धतीविषयी जाण असल्याचे लक्षात येते. पालक कायमच उत्तम शाळा, उत्तम शिक्षण कुठे मिळेल, याच्या शोधात असतात आणि आग्रही असतात. मुलांचे शाळेत जाण्याचे वय काय असावे किंवा अभ्यासक्रम कुठला निवडायचा याविषयी पालकांना जाण आहे.
- माधुरी बर्वे, मुख्याध्यापिका, डीईएस पूर्व प्राथमिक शाळा, टिळक रस्ता

शिक्षण घेताना मुलांवर चांगले संस्कार व्हावेत, त्यांना आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी, म्हणून मराठी संस्कृती असणाऱ्या शाळेची जाणीवपूर्वक निवड केली. मुलांसाठी शाळा ठरविण्यापूर्वी स्वत: काही शाळांना भेटी देऊन माहिती जाणून घेतली. परंतु मुलांचे शिक्षण महागले आहे, हे नक्की. कोणतीही शाळा निवडली, तरी शाळांचे शुल्क हे जवळपास ६० हजार ते ८० हजार रुपयांच्या आसपास आहे, हे वास्तव आहे.
- रीना गुरव, पालक

शाळांमधील साधारण शुल्क :
तपशील : अंदाजे शुल्क
पूर्व प्राथमिक (मराठी माध्यम शाळा) : ११,००० ते २७,००० रुपये
पूर्व प्राथमिक (इंग्रजी माध्यम, एसएससी बोर्ड) : ४०,००० ते ७५,००० रुपये
पूर्व प्राथमिक (सीबीएसई, आयसीएसई आणि अन्य बोर्ड) : ४०,००० ते ९५,००० रुपये
(पूर्व प्राथमिक : प्ले ग्रुप, ज्युनिअर केजी, सिनिअर केजी)