
मतदान, मतमोजणीच्या दिवशी कसबा, चिंचवडमध्ये दारूबंदी
पुणे, ता. १३ : कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने मतदान संपण्याच्या ४८ तास अगोदर म्हणजेच २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून मतदानाच्या दिवशी २६ फेब्रुवारी रोजी सांयकाळी मतदान प्रक्रिया संपेपर्यंत, तसेच मतमोजणीच्या २ मार्च रोजी मतमोजणीची प्रक्रिया संपेपर्यंत संपूर्ण मतदार संघाच्या कार्यक्षेत्रातील सर्व किरकोळ मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.
पुणे जिल्ह्यातील चिंचवड आणि कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी २६ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. ही निवडणूक खुल्या व निर्भय वातावरणात पार पडावी, यासाठी या कालावधीत मतदार संघातील सर्व किरकोळ मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश देशमुख यांनी दिले आहेत.
या बंद कालावधीत मद्यविक्री करीत असल्याचे आढळून आल्यास संबंधितांची अनुज्ञप्ती कायमस्वरूपी रद्द करण्यासह संबंधितांवर फौजदारी कारवाई केली जाईल, असेही देशमुख यांनी सांगितले.