
‘एमपीडीए’ कायद्यांतर्गत सराईत गुन्हेगार स्थानबद्ध
पुणे, ता. १३ : भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार अजिंक्य काळे याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. त्याची नाशिक मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी रवानगी करण्यात आली आहे. अजिंक्य संतोष काळे (वय २१, रा. गणेशनगर, आंबेगाव पठार, पुणे) असे आरोपीचे नाव आहे.
आरोपीने त्याच्या साथीदारांसह भारती विद्यापीठ आणि सहकारनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घातक हत्यारे बाळगून खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, गंभीर दुखापत अशा स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. त्याच्यावर मागील पाच वर्षांत सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. याबाबत भारती विद्यापीठ पोलिसांनी वरिष्ठांमार्फत आरोपीला एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्याची पडताळणी करून पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आरोपी काळे याला एमपीडीए कायद्यान्वये नाशिक मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.