
नाशिक मार्गावर तीन महिलांचा अपघाती मृत्यू; १३ जखमी नाशिक मार्गावर तीन महिलांचा अपघाती मृत्यू
राजगुरुनगर, ता. १३ : पुणे-नाशिक महामार्गावर खेडच्या शिरोलीच्या हद्दीत रस्ता ओलांडताना पुणे व हडपसर भागातील १७ स्वयंपाकी महिलांना भरधाव अज्ञात मोटारीने चिरडल्याने झालेल्या भीषण अपघातात तिघी ठार झाल्याची, तर १३ जखमी झाल्याची घटना सोमवारी रात्री अकराच्या सुमारास घडली. सुशीला देढे, इंदूबाई कोंडिबा कांबळे (वय ४६, जेपी नगर, किरकटवाडी, पुणे) या दोघी मृत्यूमुखी पडल्या. एका मृत महिलेचे नाव समजू शकले नाही. खेड पोलिस ठाण्याचे फौजदार भारत भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरोली खरपुडी रस्त्यावरील मंगल कार्यालयात स्वयंपाक काम करण्यासाठी रामटेकडी, अप्पर इंदिरानगर, स्वारगेट, किरकटवाडी, खडकवासला येथील विविध वयोगटातील १७ महिला आल्या होत्या. त्या पीएमपी बसमधून पुणे-नाशिक महामार्गावर खरपुडी फाट्यावर उतरल्या. दूरपर्यंत गाडी दिसत नव्हती म्हणून सर्वजणी मिळून रस्ता ओलांडत होत्या. तेव्हा पुण्याच्या बाजूने आलेल्या भरधाव मोटारीने त्यांना चिरडले. ती मोटार पुन्हा वळून पुण्याच्या बाजूला निघून गेली. एकूण १३ महिला जखमी झाल्या आहेत. दोघींची प्रकृती चिंताजनक आहे.