
Mahadev Jankar : विधानसभा, लोकसभेत युतीधर्म निभावणार; महादेव जानकर
पुणे : ‘‘प्रत्येक पक्षाला त्याचे संघटन मजबूत करण्याचा अधिकार आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत आम्ही युतीधर्म निभावणार आहोत. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळावर आमचे उमेदवार उभे राहतील,’’ असे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष, माजी मंत्री महादेव जानकर यांनी स्पष्ट केले.
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजप, बाळासाहेबांची शिवसेना महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ आयोजित पत्रकार परिषदेत जानकर यांनी संवाद साधला. या वेळी भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे संपर्कप्रमुख अजय भोसले उपस्थित होते.
बारामती लोकसभा मतदारसंघात पुन्हा निवडणूक लढविणार का, असे विचारले असता जानकर म्हणाले, ‘‘मी आता कसब्याच्या पोटनिवडणुकीचा प्रचार करण्यासाठी आलो आहे. मी लोकसभेला उमेदवार असताना हेमंत रासने यांनी माझ्यासाठी काम करून मदत केली होती. त्यामुळे त्यांचा प्रचार करतो आहे. बारामतीबाबतची भूमिका नंतर जाहीर करेन.’’
आमदार गोपीचंद पडळकर भाजपमध्ये आल्याने भाजप तुमच्याकडे दुर्लक्ष करत आहे का? असे विचारले असता ते म्हणाले, ‘‘मी सध्या प्रसारमाध्यमांपासून लांब आहे. पण माझे महाराष्ट्रभर दौरे सुरू आहेत. पक्षाचा विस्तार राज्यासह परराज्यातही सुरू आहे.
पडळकर हे भाजपचे कार्यकर्ते आहेत. मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे. महाराष्ट्र गुजरातसह विविध राज्यांत माझ्या पक्षाची ताकद आहे. आजवर माझ्या पक्षाचे चार आमदार निवडून आले आहेत. पक्ष वाढवण्यासाठी मी ४० वर्षे घरी गेलो नाही. राज्यात पुन्हा भाजपची सत्ता आली तरी मी मंत्रिपद मागणार नाही.
तथापि, भाजपला गरज वाटली तर ते मला मंत्री करतील. आमची भाजपबरोबर युती असून, युतीधर्म पाळण्यासाठी मी व माझा पक्ष कसब्यात काम करत आहे.’’ पहाटेच्या शपथविधीबाबत देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या गौप्यस्फोटाबद्दल विचारले असता जानकर म्हणाले, ‘‘शरद पवार व देवेंद्र फडणवीस हे मोठ्या उंचीचे नेते आहेत. त्यांच्याबद्दल मी काही बोलू शकत नाही. त्यांच्या उंचीवर मी जेव्हा पोचेन तेव्हा बोलेन.’’