लहान मुलांच्या हृदयावर ‘मिशन प्रेरणा’द्वारे उपचार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लहान मुलांच्या हृदयावर ‘मिशन प्रेरणा’द्वारे उपचार
लहान मुलांच्या हृदयावर ‘मिशन प्रेरणा’द्वारे उपचार

लहान मुलांच्या हृदयावर ‘मिशन प्रेरणा’द्वारे उपचार

sakal_logo
By

पुणे, ता. १४ : गरजू बालकांना योग्य उपचार आणि त्यासाठी अर्थसाहाय्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सह्याद्रि हॉस्पिटल्स व रोटरी क्लब ऑफ पुणे प्रिस्टीनतर्फे ‘मिशन प्रेरणा’ पुन्हा सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत हृदयाच्या समस्या असलेल्या वंचित बालकांसाठी आवश्यक प्रक्रिया केल्या जातील आणि त्यांना शस्त्रक्रियांसाठी आर्थिक मदत दिली जाईल.
‘मिशन प्रेरणा’ उपक्रम २०१८ मध्ये सुरू केला होता आणि सुमारे २५० बालकांना याचा लाभ घेता आला. त्यानंतर २०२१ मध्ये कोरोना उद्रेकाने जगाला वेठीस धरले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात सह्याद्रि हॉस्पिटल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी व अतिरिक्त संचालक अबरार अली दलाल, प्रकल्पाचे संयोजक रोटेरियन सुधीन आपटे, रोटरी क्लब ऑफ पुणे प्रिस्टीनचे अध्यक्ष अमोद फडके, सह्याद्रि हॉस्पिटलमधील पेडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट डॉ. पंकज सुगावकर, रोटरी क्लब ऑफ पुणे प्रिस्टीनचे प्रकल्प प्रमुख रोटेरियन अनुप बंदिष्टे, सह्याद्रि हॉस्पिटल्सचे समूह वैद्यकीय प्रमुख प्रसाद मुगलीकर आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. सुगावकर म्हणाले, ‘‘एकंदर निदान सुविधांमध्ये सुधारणा होत असल्याने बालकांमधील हृदयाशी निगडित समस्यांच्या उपचारासाठी पुण्यात येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. आर्थिक परिस्थिती नसल्याने वेळेवर होणाऱ्या उपचारांपासून अनेक जण वंचित राहतात. ‘मिशन प्रेरणा’ अंतर्गत पात्र रुग्णांसाठी आर्थिक सहाय्यासह हृदयरोग उपचार करण्याचे ध्येय आहे. या उपक्रमात बालकांच्या हृदय शस्त्रक्रियांसह इतर गुंतागुंतीच्या प्रक्रिया समाविष्ट केल्या जातील.’’
दलाल म्हणाले, ‘‘सह्याद्रि हॉस्पिटल्स डेक्कन येथील अद्ययावत सुविधांमुळे येथे गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया होऊ शकतात. मिशन प्रेरणा अंतर्गत रोटरी क्लब ऑफ पुणे प्रिस्टीनच्या मदतीने सह्याद्रि हॉस्पिटल्सतर्फे गरजू बालकांवर हृदयशस्त्रक्रिया व इतर प्रक्रिया करण्यात येतील.’’

हा उपक्रम विशेष करून ग्रामीण भागातील रुग्णांसाठी उपयुक्त ठरेल. साथीच्या आजारादरम्यान अनेक सेवा प्रकल्पांवर परिणाम झाला होता. मात्र आता मिशन प्रेरणा आम्ही पुन्हा सुरू केले असून जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करू, जेणे करून त्यांच्यावर योग्य उपचार होऊन ते पुढे सामान्य आयुष्य जगू शकतील.
- सुधीन आपटे, प्रकल्प संयोजक