
अक्षर सरिता फाउंडेशनतर्फे पारितोषिक वितरण
पुणे, ता. १५ ः ‘दूरदर्शनवरील अनेक कार्यक्रमांचा मी निर्माता आहे. त्यामुळे ते कार्यक्रम पाहा, असेच मी सांगेल, पण असे कार्यक्रम म्हणजे दुसऱ्या दिवशीची रद्दी; त्यापेक्षा पुस्तके अधिक वाचा. कारण पुस्तके हे ‘अक्षर’ वाङ्मय आहे. त्यातील विचार कधीच नष्ट होत नाहीत,’ असे प्रतिपादन रंगकर्मी श्रीरंग गोडबोले यांनी नुकतेच केले.
अक्षर सरिता फाउंडेशनतर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित निबंध स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्ष व लेखिका शोभा बोंद्रे, दीनदयाळ इंग्रजी माध्यम विद्यालयाच्या मुख्याध्यापिका एलिझाबेथ अवचिते, संस्थेचे सल्लागार दिलीप मोहिते, जयंत गाडगीळ, अजित कट्टी, अजित वाळिंबे आदी उपस्थित होते.
यावेळी निबंध स्पर्धेतील विजेते प्रयाग पाटणे, भारती चांदोरा, नम्रता ब्यागरी यांना गौरवण्यात आले. शलाका वाळिंबे व मृणालिनी वझे यांनी सूत्रसंचालन केले. यानंतर श्रीरंग गोडबोले लिखित-दिग्दर्शित ‘छान छोटे वाईट मोठे’ हे बालनाट्य सादर करण्यात आले.
--------------