फडणवीस मुख्यमंत्री होऊ नयेत यासाठी षड्‍यंत्र
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे पत्रकार परिषदेत टीकास्त्र

फडणवीस मुख्यमंत्री होऊ नयेत यासाठी षड्‍यंत्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे पत्रकार परिषदेत टीकास्त्र

पुणे, ता. १५ : २०१९ च्या विधानसभा निवडणुका देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली लढविण्यात आल्या. परंतु, निकाल जाहीर होताच उद्धव ठाकरे यांनी चर्चेचे दरवाजे बंद केले. फडणवीस मुख्यमंत्री होऊ नयेत, यासाठी सर्वांनी मिळून षड्‍यंत्र रचले. त्यांना महाभारतातील अभिमन्यू करण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी यात पांडवच जिंकले, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ आयोजित पत्रकार परिषदेत चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. या वेळी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे शहरप्रमुख प्रमोद (नाना) भानगिरे, रिपाइंचे शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, राष्ट्रीय समाज पक्षाचे बालाजी पवार आदी उपस्थित होते.

बावनकुळे म्हणाले, ‘‘पहाटेच्या शपथविधीबाबत देवेंद्र फडणवीस यांनी जो गौप्यस्फोट केला आहे तो खरा आहे. मी त्यांना राजकारणात २९ वर्षांपासून ओळखतो. त्यांच्यावर संस्कार झाले आहेत, ते असत्य कथन करून कधीही राजकारण करत नाहीत. भाजप कोणतीही निवडणूक असली तरी ती पूर्ण ताकदीनेच लढवतो. त्यामुळे या निवडणुकीत प्रचारासाठी मंत्री येणे हे साहजिकच आहे. अमित शहा यांचा दौरा पूर्वनियोजित आहे. त्याचा या निवडणुकीशी काही संबंध नाही. कोरोनाकाळात भाजपने कर्तव्यभावनेने मोठे काम केले, सेवा पुरविल्या. निवडणुकीत आम्ही मतदान मागत नाही, तर मताचे कर्ज जनतेकडे मागत आहोत. हे कर्ज आम्ही विविध कामांच्या स्वरूपात फेडू. कसबा हा आमचा बालेकिल्ला आहे. बापट, टिळक यांच्यानंतर कामे करण्याची परंपरा आता हेमंत रासने पुढे नेतील. ही कोणत्या समाजाची निवडणूक नाही तर देशात व राज्यात कोणत्या विचाराचे सरकार हवे, हे ठरवणारी ही निवडणूक आहे. त्यामुळे कसब्यामध्ये आमचा विजय नक्की होईल.’’

राज ठाकरेंच्या व्हर्च्युअल सभेसाठी प्रयत्न
अंधेरी पूर्वची निवडणूक बिनविरोध करा, असे आवाहन शरद पवारांनी केले होते. यामध्ये मी स्वतः आमच्या पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करून त्यांचा शब्द मान्य केला होता. कसबा पेठ आणि चिंचवडची ही निवडणूक बिनविरोध करावी, यासाठी आम्ही प्रयत्न केले, पण त्यात यश आले नाही. राज ठाकरेंच्या पाठिंब्यासाठी चर्चा झाली होती, त्यानुसार त्यांनी हा पाठिंबा दिला आहे. प्रचारात ठाकरे यांची किमान व्हर्चुअल प्रचार सभा व्हावी, यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com