
परीक्षेच्या काळात द्या, मुलांना सकस आहार
पुणे, ता. १७ : दहावी-बारावीची बोर्डाची परीक्षा म्हटलं की, परीक्षार्थींबरोबरच घरातल्या मंडळींची एकप्रकारे परीक्षाच सुरू होते. या काळात मुलांचा आहार कसा असावा, कोणत्या पदार्थांचा समावेश आहारात असावा, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ नये म्हणून काय करावे, असे असंख्य प्रश्न तुम्हाला पडले आहे का?, तर मग तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला येथे नक्की मिळणार आहेत.
याकडे लक्ष द्या
१. परीक्षेच्या काळातही मुलांना पुरेशी झोप मिळणे आवश्यक.
२. शरीराला आवश्यक असेल इतके पाणी दिवसभरात प्यावे.
३. ऋतुमानानुसारची फळे आहारात असावीत.
४. मुलांचा आहार हलका असावा.
५. फळे व जेवणामधून मुलांच्या शरीरात साखरेचे प्रमाण संतुलित राहणे आवश्यक.
६. बाहेरून आणलेले पदार्थ टाळावेत.
७. मुलांचे आरोग्य जपताना पालकांनी स्वत:च्या आरोग्याचीही काळजी घ्यावी.
हे खाणे टाळा....
- पिझ्झा, बर्गर, चिप्स असे जंकफूड
- हवाबंद डब्बा किंवा पॅकेटमध्ये मिळणारे खाद्यपदार्थ
- जास्त तिखट, तेलकट, मीठ असलेले पदार्थ
- कोल्ड ड्रिंक्स, पॅकेटमध्ये मिळणारे रेडिमेड ज्यूस
- फ्रोझन डेझर्ट, प्रक्रिया केलेल्या साखरेचे पदार्थ
काय खावे...
- कलिंगड, टरबूज यांसारखी आणि ऋतुमानानुसार उपलब्ध फळे
- बदाम, अक्रोड आदी सुकामेवा
- घरगुती जेवण आणि खाद्यपदार्थ
- कोकम सरबत, लिंबू सरबत, ताक आणि नारळ पाणी
परीक्षार्थींसाठी सर्वसाधारण डाएट प्लॅन
१. सकाळी आठपूर्वी : बदाम, अक्रोड असा सुकामेवा खायला द्यावा
२. सकाळी दहापूर्वी : घरगुती नाश्ता उदा. पोहे, उपमा, थालिपीठ, घावन
३. दुपारी बारापूर्वी : लिंबू सरबत, कोकम सरबत, नारळ पाणी इत्यादी
४. दुपारी एकपूर्वी : पचायला हलके जेवण असावे (उदा. पोळी-भाजी)
५. संध्याकाळी सहापूर्वी : फळांची प्लेट द्यावी (उदा. कलिंगड, टरबूज, सफरचंद, डाळिंब)
६. रात्री आठपूर्वी : मुगाच्या डाळीची खिचडी, वरण भात आणि भाजी
७. रात्री दहापूर्वी : पिण्यासाठी दूध हळद
परीक्षेच्या काळात मुलांना सतत ऊर्जा देणारा, हलका, सकस आणि सात्त्विक आहार द्यायला हवा. घरगुती जेवण, पदार्थ, पेय ही उत्तम. गाजर, काकडी, टोमॅटो, बीट, कडधान्यांचा वापर करून सॅलड मुलांना द्यावे. या काळात मुलांना पुरेशी झोप मिळणेही तितकेच आवश्यक आहे.
- डॉ. प्रणिता अशोक, आहारतज्ज्ञ
परीक्षेच्या काळात मुलांच्या खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. या काळात मुलांचा आहार सकस असावा, याकडे आम्ही लक्ष देतो. बाहेर खाद्यपदार्थ परीक्षेच्या काळात टाळणे उत्तम ठरते. मुलांना आवडतील ते पदार्थ घरी करून खायला दिले जातात.
- चेतना पवार, पालक