रुग्णाच्या नातेवाइकांची पाचावर धारण!

रुग्णाच्या नातेवाइकांची पाचावर धारण!

पुणे, ता. १६ : मूत्रपिंडाचा विकार असलेल्या मध्यमवयीन रुग्णावर औंध रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना मानेच्या उजव्या बाजूने शरीरात सेंट्रल लाइन टाकण्यात येत होती, पण त्यासाठी वापरली जाणारी ‘गाइडेड वायर’ तुटली आणि रुग्णाच्या नातेवाइकांच्या हृदयाचा ठोका चुकला. मात्र ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी कौशल्याने उपचार केल्याने रुग्णाला जीवदान मिळाले.

रुग्णाच्या मधुमेहाचा दुष्परिणाम मूत्रपिंडावर झाला होता. त्याच्यावर ससून रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागात उपचार सुरू होते. त्यासाठी आठवड्यातून दोन वेळा डायलिसिस लागत होते. औंध रुग्णालय घराच्या जवळ असल्याने रुग्ण डायलिसिससाठी तेथे गेला. रुग्णाच्या डाव्या मानेजवळ ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी यापूर्वीच सेंट्रल लाइन टाकली होती, पण त्याचा वापर करण्यात औंध रुग्णालयातील डॉक्टरांना मर्यादा आल्या. त्यामुळे मानेच्या उजव्या बाजूने सेंट्रल लाइन टाकण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. गाइडेड वायर वापरून सेंट्रल लाइन टाकण्यात येत होती. त्याचवेळी गाइडेड वायर तुटली. ती मानेतून थेट हृदयाच्या जवळ अडकली. हे कळताच रुग्णाच्या नातेवाइकांच्या हृदयाचा ठोका चुकला. डॉक्टरांनी रुग्णाला तातडीने ससून रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला.

ससून रुग्णालयात आपत्कालीन विभागातील डॉक्टरांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रुग्णाला तातडीने इंटरव्हेंशनल रेडिओलॉजी विभागाकडे पाठविले. रुग्णालयातील इंटरव्हेंशनल रेडिओलॉजिस्ट डॉ. किरण नाईकनवरे आणि डॉ. इब्राहिम अन्सारी यांनी रुग्णावर उपचार केले. रुग्णाच्या जांगेतून वायर टाकून हृदयाच्या जवळ अडकलेली गाइडेड वायर कौशल्याने काढली. त्यामुळे रुग्णाच्या जिवाचा धोका टळला.

डॉ. अन्सारी म्हणाले, ‘‘ससून रुग्णालयातील अद्ययावत वैद्यकीय उपकरणांमुळे रुग्णावर प्रभावीपणे वैद्यकीय उपचार करून त्याचे प्राण वाचविता आले.’’

रुग्णालयातील मेडिसीन विभागातील प्रा. डॉ. एच. बी. प्रसाद म्हणाले, ‘‘रुग्णाची प्रकृती आता स्थिर आहे. त्याच्यावर पुन्हा डायलिसिस करण्यात येत आहे. वेळेत रुग्णावर उपचार झाल्याने मोठा धोका टळला.’’

या प्रक्रियेत रेडिओलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. शेफाली पवार यांनी मार्गदर्शन केले. यात डॉ. अपर्णा रासकर, डॉ. प्रख्यात, डॉ. तेजस्वी आणि डॉ. आशिष सहभागी झाले होते.

गाइडेड वायर ही मेंदूकडून हृदयाकडे अशुद्ध रक्त घेऊन जाणाऱ्या रक्तवाहिनीत तुटली होती. ही लवकर काढली नसती तर, रुग्णाच्या उपचारातील गुंतागुंत वाढण्याचा धोका होता, असेही वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केले.
......
अशा गुंतागुंतीचे यशस्वी उपचार ससून रुग्णालयात होतात. त्यासाठी अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे आणि प्रशिक्षित मनुष्यबळ रुग्णालयात आहे. त्यातून ससून रुग्णालयातील वैद्यकीय सेवेची गुणवत्ता वाढत आहे. हे रुग्णालय समाजातील मध्यम आणि गरीब रुग्णांवरील उपचाराचे प्रमुख केंद्र आहे. त्यांच्यावर दर्जेदार उपचार करण्याच्या उद्देशाने सर्वजण प्रयत्न करीत आहे. त्यातून सरकारी रुग्णालयांवरील विश्वास वाढण्यास मदत होते,”
डॉ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे
...........

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com